उंदरांमुळे तुरुंगात अनेक दिवस उपाशी झोपलो, गलेलठ्ठ ‘टरबुजा’ची नजर ‘पुन्हा येईन’ म्हणायची

उंदरांमुळे तुरुंगात अनेक दिवस उपाशी झोपलो, गलेलठ्ठ ‘टरबुजा’ची नजर ‘पुन्हा येईन’ म्हणायची

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या आपल्या पुस्तकातील दोन प्रकरणांमधील काही उतारे सोशल मीडियावरून पोस्ट करून खळबळच उडवून दिली आहे. तुरुंगात चिचुंद्र्या आणि उंदरांमुळे झालेली उपासमार, टरबुजा उंदराने मांडलेला उच्छाद देशमुख यांनी त्यात आपल्या शब्दांमध्ये मांडला आहे. ट्विटरवर त्यांनी शेअर केलेला मजकूर वाचून निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय वर्तुळातच नव्हे, तर नेटकऱ्यांमध्येही त्यांच्या पुस्तकाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

अनिल देशमुख यांनी ‘टरबुजा’ प्रकरणाद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच अनुल्लेखाने टीका केली आहे. तुरुंगात आपली कशाप्रकारे उपासमार व्हायची हे त्यांनी सांगितले आहे. ‘तुरुंगात मला घरचे जेवण द्यायला न्यायालयाची परवानगी नव्हती, म्हणून मला तुरुंगातले जेवणच दिले जायचे. संपूर्ण तुरुंगात आणि माझ्याही कोठडीत उंदीर-चिचुंद्र्यांची भाऊगर्दीच होती. कित्येकदा तर असं व्हायचं की, जेवण यायचे आणि जेवायला थोडा जरी उशीर झाला तरी उंदीर-चिचुंद्र्या त्यावर तुटून पडलेल्या असायच्या. यामुळे कित्येकदा माझ्यावर उपाशी झोपण्याची पाळीही आली.

रविवारी आणि सरकारी सुट्टीच्या दिवशी तर जेवणाची परिस्थिती आणखीच खराब असायची; कारण रविवारी दुपारी 12 वाजता सेलचे दरवाजे जे बंद व्हायचे, ते थेट दुसऱ्या दिवशी 12 वाजता उघडायचे. म्हणजेच रविवारी दुपारी 12 वाजता जे जेवण मिळायचे त्यावरच दुसऱ्या दिवशी जेवण मिळेपर्यंतची वेळ मारून न्यावी लागायची. त्याशिवाय रविवारी दुपारी आलेले जेवण उरवून उंदीर-चिचुंद्र्यांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी ते बादलीच्या वर ठेवून त्याची राखण करत बसावे लागायचे, असा अनुभव अनिल देशमुख यांनी सांगितला आहे.

गलेलठ्ठ ’टरबुजा’ उंदराचा उच्छाद

अनिल देशमुख यांच्या या पुस्तकात ‘टरबुजा’ नावाच्या उंदराचाही उल्लेख आहे. त्या प्रकरणात ते म्हणतात की, तसे तर तुरुंगात खूपच उंदीर आणि चिंचुद्र्या होत्या; मात्र त्यामध्ये एक उंदीर एकदम वेगळा होता. अगदी गलेलठ्ठ. साहजिकच त्यामुळे तुरुंगातील सगळे त्याला ‘टरबुजा’ म्हणायचे. त्याला कितीही दूर हाकलायचा प्रयत्न केला, तरी तो अशा काही नजरेने आपल्याकडे बघायचा की, जणू काही त्याची ती नजर सांगत असायची ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन…!’, असे अनिल देशमुख यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. त्यानंतर त्यांनी ‘महाराष्ट्राच्या राजकारणातील टरबुजा – लवकरच तुम्हाला समजेल मी कोणाबद्दल बोलतोय!’ असेही म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;