समाजाची ताकद तेथे उमेदवार, नसतील तिथे पाडापाडी, मनोज जरांगे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले!

समाजाची ताकद तेथे उमेदवार, नसतील तिथे पाडापाडी, मनोज जरांगे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले!

जिथे ताकद आहे, तिथे उमेदवार उभे करणार, अशी डरकाळी फोडत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. उमेदवार नसतील तिथे पाडापाडी करून मराठा समाजाला संपविण्याचा विडा उचलणार्‍याला संपवणारच असा इशाराही त्यांनी फडणवीस यांना दिला. दरम्यान, एससी, एसटीसाठी राखीव मतदारसंघात उमेदवार देणार नाही. मात्र २८८ पैकी लढण्याचे मतदारसंघ तीन दिवसांत जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले. आंतरवाली सराटीत आज रविवारी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जरांगे यांनी आज आंतरवाली सराटीत समाजाची बैठक बोलावली होती. ते म्हणाले की, मराठ्यांची मान आजपर्यंत कधीही खाली होऊ दिली नाही. यापुढेही समाजाची उंची कायम ठेवा, काही झाले तरी मराठा समाज संपला नाही पाहिजे. निवडणुका येतील -जातील, आपल्याला हट्ट करायचा नाही. निवडणुकीसाठी समाज तुटायला नको. उमेदवार उभे करायचे की पाडायचे असे विचारता लोकांनी हात वर करून लढायचे सांगितले. उमेदवार उभे करण्यासाठी किंवा पाडापाडीसाठी समाजाची एकजूट कायम ठेवा. मला आणि समाजाला उघडे पाडू नका. उघडे पडल्यावर जात संपेल असेही ते म्हणाले.

एस्सी, एसटी राखीव जागांवर उमेदवार नाही

मुस्लिम, एससी आणि एसटीच्या जागा आहेत. तिथे उमेदवार उभा न करता आपल्या विचाराच्या उमेदवाराला लाखभर मतदान देवून निवडून द्या असे ते म्हणाले. जिथे आपण उमेदवार उभा करणार नाही, जिथे उमेदवार उभे करायचे नाहीत तिथे आमच्या विचाराशी साधर्म्य असलेल्या उमेदवार जो ५०० रुपयांच्या बॉण्डवर मी तुमच्या मागण्यांशी सहमत आहे, असे लिहून देईल त्याला निवडून देऊ. अन्यथा त्याला पाडू, अशी भूमिका त्यांनी मांडली.

समीकरण जुळवणे महत्त्वाचे

कुठे मराठ्यांची ताकद आहे ते गणित पाहणे व समीकरण जुळवणे महत्त्वाचे आहे. मी समीकरण जुळवतोय. नाही जुळलं तर अवघड आहे. संमिश्र ताकत ठेवली तर मराठा जिंकू शकतो. एक कोपरा धरून चाललो तर लढणे जिकिरीचे होईल म्हणून काही निवडून आणू, काही पाडू. ३६ मतदारसंघ असे आहेत तिथे मराठाच निवडून आणू शकतो. त्यामुळे समीकरण नाही जुळलं तर ज्याने मराठ्यांना संपवले आहे, त्याला संपवायचं हे धोरण कायम असणार असा इशारा त्यांनी दिला.

फडणवीसांनी लेकरांचं वाटोळं केलं

या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, इंग्रज तरी बाहेरचे होते, देवेंद्र फडणवीसइतका क्रूर माणूस पाहिला नाही. आई-बहिणींचे डोके फोडले. आम्हाला संपवायला निघाले होते. आता आम्ही त्यांना संपवण्यासाठी तयार आहोत. कुठलीही समिती नाही. अहवाल नाही. निवेदन नाही, आंदोलन नाही, रस्ता रोको नाही, आरक्षणासाठी आत्महत्या नाही, कुठे लढाई नाही, कुठलेच काही नसतानाही इतर जाती आरक्षणात घातल्या. इतका फडणवीस यांना मराठाद्वेष आहे. भाजपाबद्दल आमचा द्वेष नाही. तरीही त्यांनी आमच्या लेकरा-बाळांचं वाटोळं केलं. वेळ आली तर दहा पाऊले मागे घ्या, पण आपल्याला संपविण्यासाठी निघालेल्यांना संपविण्यासाठी काम करा, असे आवाहनही त्यांनी केले.

समाजासाठीच ही भूमिका

ज्यांना उमेदवारी अर्ज भरायचे आहे. त्यांनी भरा, पण २९ ऑक्टोबरला मी सांगितलेल्या ठिकाणचे अर्ज मागे घ्या. कुणाचा अर्ज ठेवायचा आणि कुणी काढायचा हे जाहीर केले जाईल. ज्याने सांगूनही अर्ज मागे घेतला नाही, त्याने पैसे खाल्ले असे जाहीर केले जाईल. कोणत्या मतदारसंघात लढायचे याचे अंतिम चित्र २३ ऑक्टोंबर रोजी जाहीर करू. एका जातींवर लढून उमेदवार निवडून आणणे सोपे नाही. परंतु पाडापाडी करणे सोपे आहे. सावधगिरीची भूमिका म्हणून समाजांचे मन मोडायचे नाही म्हणून निवडणूक लढणार असल्याचे जरांगे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;