शाळेतला सेलिब्रिटी अन् जिवलग मित्र; अतुल परचुरेंसाठी राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

शाळेतला सेलिब्रिटी अन् जिवलग मित्र; अतुल परचुरेंसाठी राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

अभिनेते अतुल परचुरे यांचं काल निधन झालं. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही महिन्यांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. मध्यंतरी त्यांची प्रकृती सुधारत होती. ते शूटिंग करू लागले होते. ‘सूर्याची पिल्ले’ हे त्यांचं नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आलं होतं. पण कॅन्सरशी त्यांची सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. अतुल परचुरे यांचे जवळचे मित्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहिली आहे. अतुल परचुरे आणि राज ठाकरे एकाच शाळेत होते. तेव्हाच्याही आठवणी राज ठाकरे यांनी शेअर केल्या आहेत.

राज ठाकरेंची पोस्ट

आज आमचा अतुल गेला…. एक उमदा नट आणि त्याहून महत्वाचं म्हणजे माझा एक जवळचा मित्र गेला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात तसं अतुलचं होतं. आम्ही सगळे बालमोहन शाळेचे विद्यार्थी. आम्ही शाळेत असतानाचा काळ असा होता की सिनेमाच्या जगातले राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना हे आमचे शाळेबाहेरचे हिरो पण अर्थात आमच्यापासून मैलांवरचे असलेले हिरो किंवा आम्ही त्यांचे चाहते म्हणू. पण शाळेत आम्ही ज्याचे चाहते होतो तो म्हणजे अतुल परचुरे. तो त्या काळात बजरबट्टू नावाच्या नाटकात काम करायचा . शाळेत असताना पण तो उस्फुर्त आणि उमदा नट. अतुल हा जन्मजात अभिनेता असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
शाळेत असताना त्याचा आणि माझा फारसा मैत्र नव्हता, पण आमच्या साठी तो तेव्हाच एक सेलिब्रिटी होता ! कॉलेजला गेल्यावर जरी आमची कॉलेजेस वेगळी होती तरी आमची मैत्री झाली आणि ती घट्ट पण होत गेली. अतुल हा खरा रंगकर्मी. कापूस कोंड्याची गोष्ट, नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली अशा नाटकांमध्ये अतुलने जे काम केलं अफाट होतं. बरं अतुल इतका नशीबवान अभिनेता की, त्याचं व्यक्ती आणि वल्ली मधलं काम पु.ल. देशपांड्यांनी फक्त पाहिलं नाही तर त्याला दाद देखील दिली.
मी जेंव्हा पक्ष स्थापन केला, तेंव्हा अतुलने पक्ष सदस्यत्वाचा फॉर्म देखील भरला होता. तेंव्हाच्या राजकीय परिस्थितीत एखाद्या कलाकाराने असं पाऊल उचलणं हे धाडस होतं, पण ते त्याने दाखवलं. तो पुढे माझ्या कुटुंबाचा भाग बनला होता. कायम आनंदी, जरा जास्तच गुटगुटीत असा हा आमचा मित्र, ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो, असा अतुल जेंव्हा कर्करोगाशी झुंज देऊन बाहेर आला, आणि जेंव्हा तो खंगला होता, तेंव्हा तो आमच्या मित्रांपैकी कोणालाच बघवत नव्हता. पण अशा अवस्थेत सुद्धा तो आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होता.
मी म्हणलं तसं अतुल हा प्रतिभावान कलावंत होता आणि वृत्तीने आनंदी होता. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपट केले, टीव्ही मालिका केल्या, हिंदीत पण त्याने अनेक टीव्ही शो केले पण अतुल हा खरा रंगकर्मी. त्याचा रंगमंचावरचा वावर, त्याच्या विनोदाच्या टाईमिंगचा असलेला सेन्स सगळंच अप्रतिम होतं. अभिनयावर कमालीचं प्रेम असलेल्या अतुलने अकाली ‘एक्झिट’ घेतली, पण जाताना रंगभूमीपासून, सर्व मित्रांच्या आयुष्यातलं काही तरी निखळलं ही भावना ठेवून गेला.
आमच्या या मित्राला माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;