मुंबईतील आणखी 125 एकर जमीन अदानीच्या घशात, धारावीकरांना देवनारच्या डंपिंग ग्राऊंडवर डम्प करण्याचा डाव
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली मिंधे सरकारचा भूखंडाचा महाघोटाळा सुरू आहे. सब भूमी गोपाल की म्हणजे परमेश्वराची आहे असे म्हटले जाते. पण मिंधे सरकारसाठी सब भूमी अदानी की आहे. त्यासाठी अदानींवर भूखंडांच्या श्रीखंडाची उधळण सुरू आहे. धारावीतील लाखो रहिवाशांना अपात्र ठरवून धारावीबाहेर काढण्यासाठी मिंधे सरकारने त्यांच्या पुनर्वसनाच्या निमित्ताने अदानींना मुंबईतील इतर ठिकाणचे भूखंड दिले जात आहेत. आज धारावीकरांना डम्प करण्यासाठी मिंधे सरकारने देवनार डंपिंग ग्राऊंडची जागा अदानींच्या घशात घातली.
धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्विकासासाठी दोन दिवसांपूर्वीच सरकारने बोरिवली, मालवणीत जागा दिली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्या लागण्याची शक्यता असतानाच आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी एक निर्णय घेत देवनारच्या डंपिंग ग्राऊंडची 125 एकर जागाही अदानींना देण्यात आली. धारावीकरांना धारावीतून हटवायचे आणि त्या डंपिंग ग्राऊंडवर डम्प करून धारावीतील मोक्याची जागा बळकावायची असा मिंधे-अदानींचा डाव आहे, हे त्यामुळे उघड झाले. सरकारच्या या निर्णयानंतर धारावीकरांचा संताप आणखी वाढणार आहे.
धारावी ही मुंबईत मध्यवर्ती भागात आणि अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसली आहे. धारावीची जागा हजारो एकर आहे. मुंबई शहरात एकाच ठिकाणी इतकी मोठी जागा मिळणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे अदानी समूहाने धारावीत अधिक रस घेतला आहे. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली तेथील मोक्याची जागा बळकावण्यासाठी अदानींना थेट दिल्लीश्वरांचा आशिर्वाद आहे आणि दिल्लीच्या आदेशावरून मिंधे सरकार अदानींना धारावी आंदण देत आहे. त्याचबरोबर मुंबईतल्या मोक्याच्या जमिनीही अदानींच्या घशात घालण्याचा सपाटाच लावण्यात आला आहे.
धारावीतील सर्व रहिवासी, उद्योग, कारखाने यांना जागा देऊनही अदानींना भरपूर जागा मिळू शकते. पण त्यांना संपूर्ण धारावीच गिळायची आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अदानी समूह धारावीकरांना मिठागरे आणि डंपिंग ग्राऊंडमध्ये हलवत आहे. मिंधे सरकार एकेक करत मुंबईतील शेकडो एकरचे भूखंड अदानी समूहाला देत आहे.
धारावीकरांच्या पाठीशी शिवसेना ठाम
धारावीतच पुनर्वसन झाले पाहिजे अशी धारावीकरांची मागणी आहे. त्याला शिवसेनेचा ठाम पाठिंबा आहे. धारावीकरांना तिथल्या तिथे घरे देता येतील. पोलीस, वांद्रे वसाहतीमधील रहिवासी आणि मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसालाही धारावीत घरे देता येतील अशी शिवसेनेची भूमिका आहे.
धारावीतच घर मिळावे यासाठी धारावीकर गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत. त्यासाठी त्यांनी धारावी बचाव आंदोलनही छेडले आहे. धारावीचा पुनर्विकास हा धारावीकरांना डोळ्यासमोर ठेवून व्हावा यासाठी तेथील सर्व जातीधर्माचे नागरिक संघटित झाले आहेत. जमिनीवर आंदोलनांद्वारे लढा देतानाच ते न्यायालयीन लढाही देत आहेत.
धारावीतच पुनर्वसन… अदानींकडून दिशाभूल करणारी बॅनरबाजी
मिंधे सरकार अदानींना खिरापतीसारखे मुंबईतील भूखंड वाटत सुटले आहे. धारावी आंदण देत आहे. दुसरीकडे अदानी समूहाने संपूर्ण धारावीत बॅनरबाजी चालवली आहे. धारावीतील सर्व पात्र झोपडीधारकांना धारावीतच पुनर्वसित केले जाईल असे दिशाभूल करणारे बॅनर अदानी समूहाच्या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने लावले आहेत. पात्र झोपडीधारकांचे धारावीत पुनर्वसन मग अपात्र ठरवून किती जणांना धारावीबाहेर काढणार याचेही उत्तर द्या अशी मागणी धारावीकर करू लागले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List