अपूर्ण काम असताना फक्त स्टंटबाजी करता, मग नामकरण का करीत नाही! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

अपूर्ण काम असताना फक्त स्टंटबाजी करता, मग नामकरण का करीत नाही! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

मिंधे आणि भाजप सरकारला मुंबई, महाराष्ट्र फक्त लुटण्यासाठी हवा आहे. मुंबईतील रेल्वे स्टेशनची नावे बदलण्याची घोषणा झाली असताना सरकारकडून अंमलबजावणी होत नाही. छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईच्या दि. बा. पाटील विमानतळाचे नामकरणही अजून रखडले आहे. मात्र गोव्याच्या विमानतळाला मनोहर पर्रीकरांचे तर अयोध्येच्या विमानतळाला ‘वाल्मीकी’ नाव दिले. त्यामुळे भाजप-मिंधे महाराष्ट्राचा इतका द्वेष का करतात, असा सवाल उपस्थित करीत अपूर्ण काम असताना स्टंटबाजी करता, मग नामकरण का करीत नाही, असा टोला आज शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारला लगावला.

नवी मुंबई विमानतळाचे काम अद्याप अपूर्ण असताना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज वायुदलाचे सी-2 95 हे विमान धावपट्टीवर उतरवण्यात आले. यावरून आदित्य ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर पत्रकार परिषद घेत भाजप-मिंध्यांच्या स्टंटबाजीचा समाचार घेतला. वायुदलाचे हे विमान शॉर्ट अॅण्ड अनपेव्हड धावपट्टीवर उतरू शकते. असे असताना वायुदलाचे विमान उतरवून घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी काय साधले. निवडणुकांसाठी स्टंटबाजीच करायची होती तर आज लोकार्पण का केले नाही? आमचे सरकार असताना या विमानतळाला दि. बा. पाटील नाव देण्याची घोषणा करण्यात आली. मग त्याची अंमलबजावणी आतापर्यंत का केली नाही, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

अदानीची भूक भागल्यानंतरच आचारसंहिता

गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 80 निर्णय घेण्यात आले. ही घाई लोकांची दिशाभूल करण्यासाठी आहे. हे काम गेल्या दोन वर्षांत का केले नाही, असा सवालही त्यांनी केला. हे जीएआर अदानीच्या फायद्यासाठी काढल्याचा आरोप करतानाच अदानीची भूक भागल्यानंतरच आचारसंहिता लागेल, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

गायमुखभाईंदर निविदेवरून सरकार तोंडघशी

राज्यात गेल्या दोन वर्षांत झालेले अनेक घोटाळे बाहेर काढल्यानंतर निर्णय बदलण्यात आले. अशाच प्रकारे गायमुख-भाईंदर मार्गाचे 16 हजार कोटींचे टेंडर काढून फक्त 20 दिवसांची मुदत देण्यात आली. मात्र हे कामही विशिष्ट पंत्राटदाराला देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत घोटाळा उघड केल्यानंतर आता न्यायालयाने सरकारला झापून ही निविदा प्रक्रिया 60 दिवसांच्या मुदतीत राबवावी, असे निर्देश दिल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ही एमएमआरडीए खाते असलेल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चपराक असल्याचे ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;