हरयाणातील निकाल हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव, नाना पटोले यांची प्रतिक्रिया

हरयाणातील निकाल हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव, नाना पटोले यांची प्रतिक्रिया

हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी अनुकूल व भाजपासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना आज जे निकाल आले ते आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहेत. सकाळी बहुतांश मतदारसंघात काँग्रेस पक्ष आघाडीवर असताना अचानक उलटे चक्र कसे फिरले? मतमोजणी केंद्रावर अनेक तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. हरयाणाचा विजय हा भाजपाने प्रशासनाच्या मदतीने मिळवला असल्याने हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव आहे, अशी प्रतिक्रीया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

हरयाणातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले बोलत होते. काही जिल्ह्यातील ईव्हीएम मशिनची बॅटरी 99 टक्के चार्ज होती आणि त्याच ठिकाणी काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला व भाजपाचे उमेदवार निवडून आले. ज्या ईव्हीएमच्या बॅटरी 60-70 टक्के चार्ज होत्या त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. ईव्हीएमशी छेडछाड केल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे.

भारतीय जनता पक्ष लोकांच्या मनातून उतरलेला आहे, हरयाणात तर भाजपाविरोधात प्रचंड संताप दिसला. त्यामुळे गडबड करून मिळवलेला भाजपाचा हा विजय लोकशाही व्यवस्थेची हत्या करणारा आहे. यासंदर्भात काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाकडे तक्रार करेल पण हा निकाल काँग्रेसला मान्य नाही, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत असे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात निवडणुका निष्पक्षपणे पार पडाव्यात यासाठी वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी काँग्रेस पक्षाने देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

हरयाणामध्ये भाजपाने गडबडी करुन विजय मिळवला असला तरी महाराष्ट्रातही तसे होणार नाही. दोन्ही राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रातील जनता भाजपा-शिंदेंच्या भ्रष्ट सरकारला कंटाळलेली आहे. भ्रष्टाचारात या सरकारने कळस गाठला आहे. जाती धर्माच्या नावावर भांडणे लावून निवडणूक जिंकण्याचा भाजपाचा कपटी डाव यशस्वी होणार नाही. असंवैधानिक पद्धतीने स्थापन करण्यात आलेल्या खोके सरकारला महाराष्ट्रातील जनता पायउतार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

जम्मू काश्मीरच्या जनतेने भाजपच्या विद्वेषी व विभाजवादी राजकारणाला हद्दपार केले. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने बहुमत मिळवले आहे. जम्मू व काश्मीर या दोन्ही भागात इंडिया आघाडीने मोठा विजय मिळवला आहे. छोटे पक्ष व अपक्षांच्या मदतीने मतविभाजनाचा भाजपचा डाव हाणून पाडत जनतेने भाजपला हद्दपार केले आहे. जम्मू काश्मीरच्या जनतेचे मन:पूर्वक आभार मानत इंडिया आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन पटोले यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;