भाषेचा आग्रह धरणाऱ्यांनी स्वत:ची पोरं कॉन्व्हेन्टमध्ये…, किरण माने यांची पोस्ट सर्वत्र चर्चेत

भाषेचा आग्रह धरणाऱ्यांनी स्वत:ची पोरं कॉन्व्हेन्टमध्ये…,  किरण माने यांची पोस्ट सर्वत्र चर्चेत

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्वाचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यात आनंद साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी जोर धरत होती. अखेर मागणी मान्य करत सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. यावर अनेक दिग्गज व्यक्तींनी प्रतिक्रिया देखील दिली. आता अभिनेते किरण माने यांनी देखील मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर लक्षवेधी पोस्ट केली आहे. सध्या सर्वत्र किरण माने यांची पोस्ट चर्चेत आहे.

काय म्हणाले किरण माने?

मराठी भाषेचा जन्म झाल्यानंतर लिपी वापरात येईपर्यंतचा बालपणीचा प्रवास लैच सुखाचा झाला. जगातल्या इतर भाषांसारखाच. पण नंतर मराठीची खरी दुर्दशा सुरू झाली. उच्चवर्णीयांनी शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे बहुजन वर्ग लिहीत-वाचत नव्हता. लिहीणारा वर्ग जो होता तो वर्चस्ववादी विचारांचा होता…त्यामुळं संकुचित होता, सर्वसमावेशक नव्हता.

या लोकांनी इतर भाषांप्रमाणे मराठीत व्याकरणशास्त्र तयार केले. पण बदलत्या काळानुसार नवनविन शब्दांसह अनेक गोष्टी भाषेत सामावून घेऊन भाषेचे नियम, व्याकरण पुन:पुन्हा ‘अपडेट’ केले तरच व्याकरण आणि भाषेची जिगरी दोस्ती होते. पण मराठीच्या कडक सोवळ्यानं ही दोस्ती दुश्मनीत बदलली.

शंभर वर्षांपुर्वी मराठी भाषेचा सखोल अभ्यास करणारे एक अतिशय विद्वान संशोधक होते – प्रा. भास्करराव जाधव. त्याकाळातला त्यांचा एक ग्रंथ आहे, ‘मराठे आणि त्यांची भाषा’. मराठी भाषेचा उगम आणि प्रवास अभ्यासपूर्ण तथ्यांसहित लिहीलाय. त्यात ते हेच सांगताना अतिशय ठामपणे लिहीतात, “भाषा मुख्य आहे – व्याकरण गौण आहे”

…पण मराठीत या वर्चस्ववाद्यांनी व्याकरणाच्या नियमांना फाजील महत्त्व दिले. भाषेतल्या इतर ग्रामीण बोलींना अस्पृश्य मानून भाषेतल्या भाषेतच ‘शुद्ध-अशुद्ध’ असा भेद केला. बहुजनांच्या रोजच्या व्यवहारातले, बोलण्या-चालण्यातले शब्द, शब्दप्रयोग हे स्विकारण्यापेक्षा ‘टाकाऊ’ ठरवले गेले. पाणी मागताना ‘पानी’ असा उच्चार आला की नाकं मुरडली गेली. त्यामुळे बहुजनसमाज या ‘प्रमाण’ मानल्या गेलेल्या तथाकथित मराठी भाषेपासून दूर गेला.

मराठी प्रमाणभाषेचा एक ठरलेला साचा बनला. वाढ थांबली. तिच्यातला रसरशीतपणा गेला. म्हणूनच कदाचित आजकाल तरूण पिढी मराठीत इंग्रजी, हिंदी शब्द वापरून तिच्यात ‘जान’ आणायचा प्रयत्न करते. तरूणाईत गाजलेली रिल्स पहा, नव्व्याणऊ टक्के ग्रामीण बोलीभाषेतच असतात. “खुपच छान” म्हणण्यापेक्षा “लई भारी” किंवा “नादखुळा” मध्ये जास्त मजा आहे. नाटकाचं नांव ‘शुभेच्छा’ असं असतं तर ते काहीतरीच वाटलं असतं, पण ‘ऑल द बेस्ट’ म्हटलं की आकर्षक वाटतं.

…बोलीभाषा जिवंत असते. तिची वाढ सुरू असते. नवनवे शब्द, वाक्यरचना आपलेसे केले जातात. बोली ही नदीसारखी खळखळत वहात रहाते. मराठी प्रमाणभाषा तिथल्या तिथंच डबक्यासारखी साचून राहिलीय. तेच तेच शब्द शतकानुशतकं वापरून वापरून गुळगळीत झालेत. त्यातला अर्थ निघून गेलाय.

तथाकथित ‘शुद्ध’ भाषा हळूहळू आचके देत कायमची मरणार आहे. शुद्ध भाषेचा आग्रह धरणार्‍यांनी स्वत:ची पोरं कॉन्व्हेन्टमध्ये शिकवली. अनेक विद्वानांचे प्रमाणभाषेतील रूक्ष ग्रंथ मराठी माणसांनाच समजत नाहीत. त्यामुळे ते हळूहळू कालबाह्य होणार आहेत. मराठी माणूस साध्या एटीएममध्ये पैसे काढायला गेला तरी वापराची भाषा इंग्लीश निवडतो. कारण मराठी शब्दांचे अर्थच कळत नाहीत. ते शब्द मृत झालेले आहेत.

आपण आपले विचार मांडताना समृद्ध, संपन्न अशा बोलीभाषांमध्ये मांडले तर ते लेखन मराठी माणसाला सहज कळेल, मनामेंदूपर्यन्त पोहोचेल आणि त्यात आशयघनता असेल तर चिरकाल टिकेल.

– किरण माने.

सांगायचं झालं तर अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कायम राजकारणावर स्वतःचं ठाम मत मांडणारे किरण माने सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;