काश्मिरी मुस्लीमशी लग्नानंतर उर्मिला मातोंडकरने केलं होतं धर्मांतर?
लग्नाच्या आठ वर्षांनंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पती मोहसीन अख्तर मीरपासून विभक्त होणार असल्याची बातमी समोर येत आहे. 2016 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रामुळे या दोघांची एकमेकांशी भेट झाली होती. लग्नानंतर उर्मिलाने धर्मांतर केल्याची त्यावेळी खूप चर्चा होती.
मोहसीन हा उर्मिलापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान असून तो काश्मिरी बिझनेसमन, अभिनेता आणि मॉडेल आहे. मोहसिनशी लग्न केल्यानंतर उर्मिलाने इस्लाम धर्म स्वीकारल्याची चर्चा होती. त्यावर 'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत उर्मिलाने स्पष्टीकरण दिलं होतं.
अशा अफवा पसरवणं खूप चुकीचं आहे. अशा पद्धतीचं राजकारण मला अजिबात आवडत नाही. जरी मी धर्मांतर केलं तरी काय फरक पडणार आहे? मी नेहमीच माझ्या मर्जीनुसार वागले आणि ताठ मानाने प्रत्येक निर्णय घेतले आहेत. मला स्वत:वर खूप अभिमान आहे. मी असं म्हणत नाही की मी कधीही चुकले नाही, परंतु मला लाज वाटावी अशा गोष्टी मी कधीही केल्या नाहीत", असं उर्मिला म्हणाली होती.
ज्या इंडस्ट्रीत मी काम करत होते, तिथे राहून नकारात्मकता, गॉसिप, एकमेकांच्या मागून बोलणं या सर्वांपासून लांब राहण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. मी कधीच या गोष्टी केल्या नाहीत. त्यामुळे धर्मांतराच्या चर्चांमुळे मी खूप चकीत झाले. मी हिंदू आहे आणि त्याच धर्माचं पालन करते. परंतु मी हिंदू धर्मावर व्यापक अर्थाने विश्वास ठेवते. हल्ली आपल्यावर ते थोपवलं जातं, त्यावर नाही", असं उर्मिलाने स्पष्ट केलं होतं.
धर्मांतराविषयी ती पुढे म्हणाली, "जरी मी इस्लाम धर्म स्वीकारला असता तरी ती गोष्ट मी अभिमानाने सांगितली असती. तरीसुद्धा माझ्या खासगी आयुष्यात नाक खुपसण्याचा अधिकार कोणालाच नाही. मी मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्याने धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलतेय, असं नाही. उलट मला त्यावर विश्वास आहे आणि दुसऱ्या धर्मात लग्न करण्याविषयीचे माझे विचार आधीपासूनच स्पष्ट होते, म्हणून बोलतेय."
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List