खंडणीसाठी विद्यार्थ्यांचे अपहरण; दोघे जेरबंद
पोलीस असल्याची बतावणी करीत दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी दोन विद्यार्थ्यांचे अपहरण करणाऱ्या टोळीतील दोघा आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले. ही घटना 29 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास जांबे येथे घडली.
योगेश विश्वास सावंत (वय 34, रा. राऊतनगर, अकलूज, जि. सोलापूर) आणि ज्ञानेश्वर विलास घाडगे (वय 26, रा. मगरवस्ती खंडाळी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शुभम यशवंत कुलकर्णी (वय 21, रा. लिगसी मिलिनिया सोसायटी, गायकवाडनगर, पुनावळे) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र अभ्युदय चौधरी हे दोघेजण दुचाकीवरून चालले होते. यावेळी दोन कारमधून आलेल्या आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्राला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले. तसेच आरोपींनी पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवत दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मात्र, पैसे न मिळाल्याने आरोपींनी 50 हजार रुपये किमतीच्या दोन अंगठ्या, 1 लाख 25 हजार रुपये किमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 15 हजारांचे घड्याळ असा ऐवज मारहाण करून काढून घेतला. त्यांना मारहाण करून फलटण येथे रात्रभर डांबून ठेवले. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी पंढरपूर महामार्गावर सोडून दिले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी खंडणीविरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाला समांतर तपासाचे आदेश दिले.
पथकाने घटनास्थळाजवळील तसेच टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. आरोपी माळशिरस येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, एक टीम माळशिरस येथे रवाना करण्यात आली. फौजदार सुनील भदाणे व टीमने स्थानिक पोलिसांच्या मदतीने घाडगे व योगेश यांना अकलूज येथून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार व दोन मोबाईल असा 8 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी घाडगे पोलीस रेकॉर्डवरील असून, त्याच्यावर वेळापूर पोलीस स्टेशन, सोलापूर येथे गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच इतर आरोपींवरही खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अॅट्रॉसिटी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, फौजदार सुनील भदाणे, सुनील कानगुडे, प्रदीप गोडांबे, किशोर कांबळे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, किरण काटकर, आशिष बोटके, प्रदीप गायकवाड, हुलगे यांच्या पथकाने केली. महिला सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
पिंपळे गुरव येथील तरुणावर वार
दरमहा तीन हजार रुपयांच्या खंडणीच्या मागणीसाठी तरुणावर चाकूने वार करण्यात आले. नशीमअली रोजअली शहा (वय 20, रा. भगतसिंग चौक, पिंपळे गुरव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय दशरथ शिंदे उर्फ वल्या (वय 23, रा. धोत्रे चाळ, वैदवस्ती, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शहा हे पिंपळे गुरव येथील इरफान केटरिंग नावाच्या दुकानात होते. त्यावेळी अक्षय हा तिथे आला. त्याने आपण येथील भाई असून, या परिसरात धंदा करायचा असल्यास दरमहा तीन हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असे सांगून भीती दाखविण्यासाठी चाकू काढला. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने फिर्यादी नशीमअली याच्यावर पाठीत चाकूने वार केला. तसेच ममता स्वीट या दुकानासमोर उभे असलेल्या कबीर महेंद्र कोल्हे या मुलाच्या मागे चाकू घेऊन पळू लागला. तसेच चाकूचा धाक दाखवत परिसरात दहशत निर्माण केली. आरोपी अक्षय याच्यावर सांगवी पोलिसांत तीन गुन्हे दाखल आहेत. फौजदार खलाटे तपास करीत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List