अनुभव नसलेल्या जयदीप आपटेला काम दिल्यानेच पुतळा कोसळला; शरद पवार यांनी कारण स्पष्टच सांगितले
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला. हा पुतळा जोरदार वाऱ्यांमुळे कोसळला, असे सांगण्यात येते. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे सुमद्रकिनारी अनेक वर्षे उभे आहेत. त्याठिकाणीही वाऱ्यांचा वेग असाच असतो. मात्र, या पुतळ्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्यानेच तो पडला, तसेच पुतळा उभारण्यापूर्वी जो अभ्यास करण्याची गरज होती, तो करण्यात आला नाही, असे दिसून येते, असेही शरद पवार म्हणाले. तसेच ज्यांना काम दिले, तो जयदीप आपटे अनुभवी नव्हता, त्याला एवढ्या मोठ्या कामाचा अनुभव नव्हता, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे दिसून येते, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम ज्याला देण्यात आले होते, त्या जयदीप आपटे याचा या क्षेत्रातील अनुभव मर्यादित स्वरुपाचा होता. त्याने एवढं मोठं काम कधी केल्याचे दिसत नाही. असं असतानाही त्याच्यावर इतकी मोठी जबाबदारी कशी काय टाकण्यात आली? जयदीप आपटेच्या कामाचा दर्जा पाहता त्यामुळेच हा अपघात घडल्याचे दिसते, असे शरद पवार म्हणाले.
मुख्यमंत्री आणि इतर काहीजण पुतळा पडण्यासाठी वाऱ्याचा वेग कारणीभूत असल्याचे सांगत आहेत. पण स्पष्ट सांगायचं झालं तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. मुंबईत इंडिया गेटनजीक शिवाजी महाराजांचा पुतळा 1960 साली उभारण्यात आला होता. त्याला काही झालेलं नाही. शिवाजी पार्कमध्येही शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तिकडेही मागच्या बाजूला समुद्र आणि समोर मैदान आहे. त्यामुळे पुतळा पडण्यासाठी वाऱ्याच्या वेगाचे जे कारण सांगितले जात आहे, ते अयोग्य असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
या पुतळ्याचे काम ज्याला देण्यात आले होते, त्याचा अनुभव मर्यादित होता. त्याला अशाप्रकारचं काम देणं योग्य नव्हतं. शेवटी घडायचे ते घडले. यामुळे राज्यभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या, असे शरद पवार यांनी म्हटले. महाराष्ट्रात शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. तो तयार करण्यासाठी कुणाला काम दिलं, त्यात भ्रष्टाचार झाला. त्यामुळे ही दुर्घटना घडली आणि जनतेने सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला. यात राजकारण करण्याचे काहीही कारण नाही. लोकशाही जनतेला त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List