घटस्फोटानंतर पहिल्यांदा मुलाला भेटला हार्दिक पांड्या; नताशा परदेशात स्थायिक?
क्रिकेटर हार्दिक पांड्याला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टँकोविक मुलाला घेऊन तिच्या मायदेशी म्हणजेच सर्बियाला परतली होती. हार्दिक आणि नताशा यांचा मुलगा अगस्त्य हा चार वर्षांचा आहे. सोशल मीडियावर घटस्फोट जाहीर करण्याच्या एक दिवस आधीच नताशा मुलाला घेऊन मायदेशी गेली होती.
नुकतीच ती भारतात परत आली आहे. नताशासोबत अगस्त्यसुद्धा भारतात परत आला असून त्याने वडिलांची भेट घेतली. त्याचे सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये तो काकी पंखुडी शर्मासोबत खेळताना दिसला.
पत्नी नताशापासून विभक्त झाल्यानंतर हार्दिक पहिल्यांदा त्याच्या मुलाला भेटला. यावेळी त्याने अगस्त्यसोबत चांगला वेळ घालवला. हार्दिकची वहिनी पंखुडीने त्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये अगस्त्यची झलक पहायला मिळतेय.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अगस्त्य काहीतरी वाचताना आणि त्याच्या चुलत भावंडांसोबत खेळताना दिसत आहे.
हार्दिक आणि नताशाने जुलै महिन्यात सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. परस्पर संमतीने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं. हार्दिक-नताशाने 2020 मध्ये गुपचूप लग्न उरकलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये दोघांनी पुन्हा हिंदू आणि ख्रिश्चन विवाहपद्धतीनुसार लग्न केलं. नताशाने 30 जुलै 2020 मध्ये मुलाला जन्म दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List