महसूलच्या भूखंडावर बेकायदा कंटेनर यार्ड, गॅरेज, माफियांचा अड्डा; उरणमधील 45 एकर जागा अतिक्रमणाच्या विळख्यात
उरणमधील पागोटे-धुतूम दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेली महसूल विभागाची 45 एकर जागा सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे. या जागेवर बेकायदा पार्किंग, कंटेनर यार्ड, गॅरेज आणि धाबे सुरू करण्यात आले आहेत. काही माफियांनी या ठिकाणी आपले अड्डेही सुरू केले आहेत. हा सर्व गैरकारभार महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करू लागले आहेत.
जेएनपीए-पळस्पे दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात कंटेनर मालाची वाहतूक होत आहे. पागोटे-धुतूम दरम्यान रस्त्याच्या कडेला दुतर्फा असलेल्या महसूल विभागाची 181 सर्व्हे नंबरमध्ये सुमारे 45 एकर मोकळी व गुरचरणाची आरक्षित जागा आहे. याआधी 2013 मध्ये महसुली विभागाने या जागा खासगी विकासकाला कोळंबी संवर्धन प्रकल्प व लागवडीसाठी भाडेतत्त्वावर दिली होती. मात्र खासगी विकासकाने लागवड व मत्स्यपालन व्यवसायासाठी दिलेल्या जागेवर अनधिकृतपणे कंटेनर यार्ड सुरू केले होते. त्यामुळे ही जागा परत काढून घेण्यात आली होती. आता हीच जागा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे.
कारवाईची मोहीम सुरूच
जेएनपीए परिसर आणि उरण, न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशा बेकायदेशीर पार्किंग, ढाबे, कॅन्टीनमधून चालणाऱ्या अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरूच असते अशी प्रतिक्रिया न्हावा शेवा बंदर पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त डॉ. विशाल नेहूल यांनी दिली.
चालकांना दमदाटी करून पार्किंग
महसूल विभागाच्या जागेवर काही समाजकंटकांनी अवैधरित्या कंटेनर पार्किंग, कंटेनर यार्ड, गॅरेज, ढाबे उभारलेले आहेत. वाहनचालकांना दमदाटी, प्रसंगी शिवीगाळ, मारहाण करून जबरदस्तीने अवजड वाहने पार्किंग करण्याची सक्ती केली जाते. त्यांच्याकडून पार्किंगच्या नावाखाली पैसेही वसूल केले जातात, तर अवैधरित्या उभारण्यात आलेल्या ढाबे, कॅन्टीनमधून राजरोसपणे दारू, अमली पदार्थांची विक्री केली जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List