स्वातंत्र्य शंभरीला आले तरी महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत, विधान परिषदेच्या शताब्दी समारोहात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची खंत
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरे केला. काही वर्षांनी शतकोत्सव साजरे करू, परंतु महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. आजही त्यांच्याकडे वाईट दृष्टीने पाहिले जाते, अशी खंत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज व्यक्त केली. महिलांचा जेव्हा आदर होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याला अर्थ आहे, महिलांकडे समाजात वाईट दृष्टीने पाहिले जाणार नाही, असा समाज घडवणे हे प्रत्येकाचेच दायित्व आहे, असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतकोत्सव सोहळय़ात राष्ट्रपती बोलत होत्या. महिलांच्या सशक्तीकरणासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. महिलांचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास होईल तेव्हाच देशाचा विकास होईल. राजमाता जिजाऊ भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले, तसे महिलांनी योगदान द्यावे, असे राष्ट्रपती मुर्मू यावेळी म्हणाल्या. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणासाठी गौरव
महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणांसाठीच्या पुरस्कारांचे आज राष्ट्रपतीच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यात शिवसेना नेते व विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू आणि शिवसेना आमदार सुनील शिंदे यांचा उत्कृष्ट भाषणासाठी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 2018-19 ते 2023-24 पर्यंतच्या सहा वर्षांचे पुरस्कार यावेळी देण्यात आले.
राष्ट्रपतींकडून महाराष्ट्राचा जयजयकार
राष्ट्रपतींनी भाषणाची सुरुवात ‘बहु असोत, सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ या ओळींनी केली आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताने भाषणाची सांगता केली. राष्ट्रपतींनी या कृतीने सभागृहातील सर्वांची मने जिंकली.
महाराष्ट्राचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल
हिंदुस्थान हा जगाचा मार्गदर्शक आहे. परदेशातील नागरिक हिंदुस्थानी संस्कृतीचा पुरस्कार करतात. त्यामुळे आपण चांगल्या संस्कृतीचे जतन करायला हवे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र हा देशाचे सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि आर्थिक प्रतिनिधित्व करत आहे. महाराष्ट्राचा विकास झाला तर भारताचा विकास होईल, असेही राष्ट्रपती मुर्मू यावेळी म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List