मिंधे सरकारच्या लाडक्या कंत्राटदारासाठी हजारो तरुणांच्या कायम रोजगारावर गदा, जयंत पाटील यांचा गंभीर आरोप
राज्यातील मिंधे सरकारने मागच्या दाराने सरकारी नोकऱ्यांचे खासगीकरण सुरू केले आहे. महिला व बालविकास विभागातील 2063 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातील 1145 पदे भरण्याचा ठेका हा पुण्यातील एका कंपनीला देण्यात आला आहे. मिंध्यांच्या लाडक्या कंत्राटदारासाठी बेरोजगार तरुणांच्या कायम रोजगारावर गदा आणली जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
आयुक्त महिला व बालविकास यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालये, शासकीय संस्था व केंद्र पुरस्कृत योजनांकरिता मंजूर करण्यात आलेली गट-ड व गट-क मधील पदांची भरती बाह्ययंत्रणेद्वारे करण्यात यावी, असे आदेश मिंधे सरकारने काढले आहेत. मंजूर 2063 पदांपैकी केंद्र पुरस्कृत योजनेकरिता मंजूर करण्यात आलेली 918 पदे वगळून उर्वरीत 1145 पदे भरण्याचे कंत्राट पुण्यातील ज्या Brisk India Pvt. Ltd. कंपनीला दिले आहे. याच कंत्राटदाराला वैद्यकीय शिक्षण विभागाचे कंत्राटी पद भरतीचे कामदेखील नियम डावलून देण्यात आले आहे. हे एकप्रकारे सरकारी नोकऱयाच मागच्या दाराने खासगीकरण असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
आमचे अगोदरपासून म्हणणे आहे की, हे सरकार गोरगरीब, शेतमजूर, सामान्य जनतेचे नसून बिल्डर आणि कंत्राटदारांचे देशातील आतापर्यंतचे सर्वात भ्रष्ट सरकार आहे.
हा कंत्राटदार कोणाचा ‘लाडका’ आहे?
बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणारी पदे ही ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या सेवा पुरवठादार कंपनीशी करार करून भरण्यात यावीत. हे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी 18 टक्के सेवा शुल्क तसेच याव्यतिरिक्त लागू असलेले कर सेवा पुरवठादारास देण्यात यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. एवढय़ा मोठय़ा संख्येने पदभरती करण्याचे काम देण्यात आलेला पुण्यातील हा कंत्राटदार कुणाचा असा सवाल पाटील यांनी केला आहे.
अशी होणार कंत्राटी पदभरती
पदाचे नाव बाल विकास महिला विकास
वरिष्ठ काळजी वाहक 44 16
कनिष्ठ काळजी वाहक 64 34
स्वयंपाकी 18 17
सफाईगार 27 10
पहारेकरी 6 11
परिचर 5 0
शिपाई 15 2
सुरक्षा रक्षक 396 480
एकूण 575 570
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List