6 फुटांचीच परवानगी दिली होती, 35 फुटी पुतळा कुणी बनवला? कला संचालक डॉ. राजीव मिश्रांनाही धक्का, नियम डावलून शिल्पकाराने उंची वाढवली

6 फुटांचीच परवानगी दिली होती, 35 फुटी पुतळा कुणी बनवला? कला संचालक डॉ. राजीव मिश्रांनाही धक्का, नियम डावलून शिल्पकाराने उंची वाढवली

मालवणच्या राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाबद्दल धक्कादायक खुलासे होत आहेत. पुतळा बनवण्यापूर्वी कला संचालनालयाची परवानगी घ्यावी लागते. या शिवपुतळय़ासाठी संचालनालयाने फक्त 6 फुटांचीच परवानगी दिली होती. मग नियम डावलून 35 फुटी पुतळा पुणी उभारला? असा सवाल कला संचालक डॉ. राजीव मिश्रा यांनी उपस्थित केला आहे. नौदलाने इतका उंच पुतळा उभारायला सांगितला याचीही कल्पना नसल्याचे त्यांची सांगितले.

शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेमध्ये कला संचालनालयाची कोणतीही चूक नाही, असे डॉ. मिश्रा यांनी स्पष्ट केले. 35 फुटांचा पुतळा उभारला जातोय याची कोणतीही कल्पना कला संचालनालयाला सरकारकडून देण्यात आली नाही, असे ते म्हणाले.

ब्राँझऐवजी स्टीलचा वापर करणार सांगितलेच नव्हते

डॉ. मिश्रा यांनी पुतळा उभारणीसाठी असलेल्या प्रक्रियेचीही माहिती दिली. आमच्यासमोर 6 फुटांचे क्ले मॉडल सादर करण्यात आले होते. 35 फुटांचा पुतळा असेल आणि त्यात स्टेनलेस वापरले जाईल हे पुणीही सांगितले नव्हते. इतका उंच पुतळा बनवला तर त्यात ब्रासचा वापर अधिक करायला हवा होता, असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.

तज्ञांकडून बारकाईने तपासणीनंतरच परवानगी

कला संचालनालयाकडे पुतळय़ाचे क्ले मॉडेल सादर करावे लागते. त्या मॉडेल्सची शिल्प तज्ञांकडून बारकाईने तपासणी होते. ज्या महापुरुषाचा पुतळा आहे त्याचा इतिहास, ज्या आवेशातील पुतळा आहे त्या आवेशामध्ये व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव, पुतळय़ाची उंची, पुतळा महापुरुषासारखा दिसतोय की नाही याबाबत शिल्पतज्ञ तपासणी करतात. त्यानंतरच पुतळय़ाला परवानगी दिली जाते, अशी माहिती डॉ. मिश्रा यांनी दिली.

परवानगीनंतर सर्व जबाबदारी शिल्पकाराचीच

कोणताही पुतळा उभारताना चबुतरा बांधावा लागतो. त्या चबुतऱ्यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुविशारदाकडून परवानगी घ्यावी लागते. पुतळा आणि चबुतऱ्याच्या बांधकामाची परवानगी मिळाल्यानंतर शिल्पकाराला तसे लेखी कळवले जाते. त्यानंतरची सर्व जबाबदारी शिल्पकाराची असते, असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.

निकृष्ट वेल्डिंग, नटबोल्टचा वापर दुर्घटनेस कारणीभूत

प्रथमदर्शनी पाहिले तर मालवणातील शिवपुतळा तयार करताना शिल्पकाराने बरीच घाई केल्याचे दिसते. त्याने ब्राँझ न वापरता स्टील प्लेट्स टापून वेल्डिंग केले, वेल्डिंगही निकृष्ट दर्जाचे होते आणि जोडणीसाठी नटबोल्टचा वापर केला गेला. या हलगर्जीमुळेच पुतळा कोसळला असावा असा निष्कर्ष काढता येईल, असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.

सरकार आणि मिंध्यांनी चूक कबूल केली महाराजांची शंभर वेळा माफी मागतो

मालवणातील शिवपुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवरून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या  घटनेची जबाबदारी टाळणाऱ्या मिंधे सरकारचा सर्वत्र निषेध होत आहे. राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धाबे दणाणले आहेत. जावे तिथे त्यांना पुतळा प्रकरणावरून जाब विचारला जात आहे. आज तर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर हात जोडून माफी मागितली. शिवरायांच्या चरणांवर डोके ठेवून शंभर वेळा माफी मागतो, असे त्यांनी सांगितले. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी किल्ल्याचा संपूर्ण परिसर संरक्षित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राजकोटचा परिसर संरक्षित केला जाणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;