Latur News – दुर्दैवी घटना! अहमदपूरमध्ये दहीहंडी फोडताना युवकाचा मृत्यू
अहमदपूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान एक युवक दहीहंडी फोडताना जखमी झाला होता. त्याला अहमदपूर येथे प्रथोमपचार करून पुढील उपचारांसाठी लातूर येथे पाठवण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योध्दा प्रतिष्ठान अहमदपूरच्या वतीने दिनांक 28 ऑगस्ट रोजी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी संघाच्या विजेत्यांसाठी पारितोषिक ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत अहमदपूर शहरासह बाहेरील अनेक मंडळांनी सहभाग नोंदवला होता. तसेच स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी दहीहंडी फोडताना साठे नगर येथली युवक उदय महेश कसबे (17) हा दहीहंडी फोडताना थरावरून कोसळला. त्याला जखमी अवस्थेत लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच दहीहंडीचे आयोजन करणार्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुटुबियांनी केली आहे.
आयोजकांनी स्पर्धेचे नियम, अटी आधीच स्पष्ट केलेले असताना टीम संयोजकांनी याची काळजी घेतली होती का नाही? पोलीस याबद्दल काय भूमिका घेतात? तक्रार झाल्यानंतर पोलीस यावर काय भूमिका घेतील? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून लवकरच या सर्व बाबी स्पष्ट होतील. अधिक तपास पोलीस करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List