जुनी कार स्क्रॅप करा आणि सवलत मिळवा, नितीन गडकरींची नवी घोषणा
देशातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने जुन्या वाहनांना स्क्रॅपिंग धोरण लागू केले. या धोरणाअंतर्गत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नवी घोषणा केली आहे. जुनी वाहने स्क्रॅप करून नवीन वाहनांना सवलत देण्याचे मान्य केले आहे. नितीन गडकरी यांनी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी याबाबत सविस्तर चर्चा केल्याचे कळते.
जुनी प्रदूषित वाहने टप्प्याटप्प्याने काढून टाकणे हा वाहन स्क्रॅपिंग धोरणाचा उद्देश आहे. 1 एप्रिल 2022 पासून हे धोरण लागू करण्यात आले होते. मार्च 2025 पर्यंत 90 हजार जुनी वाहने भंगारात बदलण्याचे सरकारचे उद्दीष्ट्य आहे.
जुनी वाहने स्क्रॅप केल्यानंतर नवीन वाहनांवर सूट देण्यात येणार आहे. ऐन सणासुदीत केंद्र सरकारने केलेल्या नव्या घोषणेमुळे वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
प्रवासी वाहन उत्पादक स्क्रॅप केलेल्या वाहनांच्या बदल्यात नवीन कार खरेदीवर 20 हजार रुपयांपर्यंत सवलत देतील. मर्सिडीज-बेंझ इंडियाने विद्यमान ऑफर व्यतिरिक्त 25 हजार रुपयांची सवलत जाहीर केली आहे. आगामी काळात वाहन उत्पादक कंपन्या अतिरिक्त सवलतही जाहीर करू शकतात.
व्यावसायिक वाहन उत्पादकांनी 3.5 टनांपेक्षा जास्त वजनाच्या भंगार व्यावसायिक मालवाहू वाहनांसाठी एक्स शोरूम 3 टक्के सवलत देणार आहे. तर 3.5 टनांपेक्षा कमी वजनाच्या वाहनांवर 1.5 टक्के सवलत देण्यात येईल. जड आणि हलकी व्यावसायिक वाहने स्क्रॅप करण्यासाठी ट्रेडेड डिपॉझिट प्रमाणपत्र वापरणाऱ्या खरेदीदारांना 2.75 आणि 1.25 टक्के सूट मिळेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List