नांदेडमध्ये खासदार वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अश्रूनी ओथंबलेले साश्रू नयन.. क्षणोक्षणी फुटणारा हुंदक्यांचा बांध.. भावाविवश कुटुंबाचा शोकमग्न कोलाहल अन एकमेकांना सावरणारी भावाविभोर माणसं..अतिव दुःख वियोगाने भारावलेल्या अशा वातावरणात नांदेड लोकसभेचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर मंगळवारी नायगांव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. चिरंजीव रणजित व रवींद्र चव्हाण यांनी चितेला मुखाग्नी देताच शोकाकुल हजारो नागरिकांनी साहेब परत या च्या आर्जवाने दिलेला अखेरचा निरोप उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेवून गेला.
गेल्या काही दिवसापासून प्रकृती अस्वस्थ असल्याने हैद्राबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना खा.वसंतराव चव्हाण यांचे सोमवारी पहाटे दुःखद निधन झाले. त्यामुळे सबंध नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली. सोमवारी दुपारीच हैद्राबाद येथून विशेष रुग्णवाहीकेने दिवंगत खा.वसंतराव चव्हाण यांचे पार्थिव देगलूर, शंकरनगर, नरसी मार्ग त्यांची जन्मभूमी असलेल्या नायगांव नगरीत आणण्यात आले.
नायगांव येथील वाड्यात मंगळवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले. नरसीसह परिसरातील अनेक ठिकाणी बाजारपेठ बंद ठेवून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विशेष पोलीस पथकाने तिरंगा ध्वज गुंडाळलेल्या पार्थिवाला सलामी देत हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून अखेरची मानवदंना दिली. त्यानंतर चि.रणजित व रवींद्र चव्हाण यांनी शोकाकुल वातावरणात चितेला अग्निडाग देवून संपूर्ण कुटुंबियांनी दिवंगत खा.वसंतराव चव्हाण यांना अखेरचा निरोप दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List