आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेलसमोर भाजपच्या चिल्यापिल्यांची हुल्लडबाजी; शिवसैनिकांनी तिंबून काढले

आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेलसमोर भाजपच्या चिल्यापिल्यांची हुल्लडबाजी; शिवसैनिकांनी तिंबून काढले

शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेलसमोर हुल्लडबाजी करणार्‍या भाजपच्या चिल्यापिल्यांना शिवसैनिकांनी तिंबून काढले. कोणतीही परवानगी न घेता भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनाला पोलिसांनी पाठीशी घातले. भाजपच्या मिठाला जागून पोलिसांनी शिवसैनिकांवरच लाठीमार केला. महिला शिवसैनिकांवर लाठ्या चालवत आहोत याचेही भान मिंधेगिरी करणार्‍या पोलिसांना राहिले नाही.

शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे हे शिवसंकल्प मेळाव्याच्या निमित्ताने दोन दिवसांच्या छत्रपती संभाजीनगर दौर्‍यावर आले होते. आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेल रामा इंटरनॅशनलसमोर सकाळीच भाजपचे हर्षवर्धन कराड, जालिंदर शेंडगे यांच्यासह काही फुटकळ कार्यकर्ते गोळा झाले आणि घोषणाबाजी करू लागले. भाजपची पिलावळ राडा करण्याच्या तयारीत असल्याचे कळाल्यावरून शिवसैनिकही अगोदरच तयारीत होते. शिवसैनिकांनी या चिल्यापिल्यांना चांगलेच तिंबून काढले. शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहून भाजप कार्यकर्त्यांची चांगलीच तंतरली.

भाजपच्या मदतीला पोलीस धावून गेले
शिवसेनेचे विभागीय नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे काही कार्यकर्ते हॉटेलसमोर नौटंकी करणार असल्याची पूर्वकल्पना पोलिसांना दिली होती. दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू असतानाच पोलीस हाताची घडी घालून उभे होते. मात्र काही मिनिटात अचानक भाजपच्या मिठाला जागत पोलिसांनी शिवसैनिकांवर अमानुष लाठीमार करण्यास सुरुवात केली. महिला आघाडीच्या सुकन्या भोसले यांना तर फरफटत नेले. युवा सेनेचे धर्मराज दानवे, पुरुषोत्तम पानपट यांनाही पोलिसांनी लाठ्या मारल्या. पोलिसांची मिंधेगिरी सुरू असतानाच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे तिथे आले. त्यांनी खडे बोल सुनावताच पोलिसांच्या लाठ्या म्यान झाल्या. त्यानंतर शिवसैनिकांना एका गाडीत कोंबून सिडको पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

पोलीस ठाण्यात दिवसभर तमाशा
शिवसैनिक तसेच भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी सिडको पोलीस ठाण्यात आणले. सकाळी दहा वाजता घटना घडूनही सायंकाळी सात वाजेपर्यंत पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली. अखेर उशिरा २८ शिवसैनिक आणि ३२ भाजपच्या कार्यकर्त्यांवर दंगलीचे गुन्हे नोंदवण्यात आले.

पोलिसांनी मिंधेगिरी केली; अंबादास दानवे यांचा आरोप
पोलिसांनी मिंधेगिरी करत शिवसैनिकांवर लाठीमार केला. भाजपचे कार्यकर्ते नौटंकी करणार असल्याची पूर्वकल्पना आपण स्वत: पोलीस आयुक्तांना दिली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांना अडवण्याची जबाबदारी पोलिसांची होती. परंतु पोलीस भाजपच्या मिठाला जागले, असा स्पष्ट आरोप शिवसेनेचे विभागीय नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

भाजपचे आंदोलन कितपत योग्य? आदित्य ठाकरे यांचा सवाल
राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. मिंध्यांच्या राज्यात चिमुरड्याही सुरक्षित नाहीत. पोलिसांनी वेळीच कारवाई करावी म्हणून काल पक्षविरहित आंदोलन करण्यात आले. यामध्ये कोणाचाही अनादर होईल असे काहीही घडले नाही. असे असताना भाजपने आज आंदोलन करणे कितपत योग्य आहे, असा सवाल शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;