शिवरायांचा पुतळा उभारणाऱ्या ठाण्याच्या कंत्राटदारासह त्याच्या संस्थांना काळ्या यादीत टाका; सुप्रिया सुळे यांची मागणी
सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. हा पुतळा सोमवारी दुपारी अचानक कोसळला. एक वर्ष पूर्ण होण्याआधीच पुतळा कोसळल्याने याचे काम घाईघाईत उकरण्यात आले होते. तसेच ते निकृष्ट दर्जाचे होते, हे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे या घटनेने या घटनेने विविध राजकीय पक्षांनी आणि शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून संबंधित कंत्राटदार आणि त्याच्या संस्थांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी एक्सवर याबाबतची पोस्ट केली आहे. तसेच ती पोस्ट त्यांनी सीएमओ महाराष्ट्र यांना टॅग केली आहे. तसेच या पोस्टसोबत त्यांनी या पुतळ्याच्या कामाबाबतची वर्क ऑर्डरही जोडली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळला, तो पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. हि व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे, अशी आमची मागणी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळला, तो पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. हि व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत… https://t.co/GMHKxiDzah pic.twitter.com/lmacA8HKZZ
— Supriya Sule (@supriya_sule) August 26, 2024
याआधी घटना घडल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत हा छत्रपती शिवरायांचा अवमानआहे, अशा शब्दांत त्यांनी मिंधे सरकारला फटकारले होते. त्यानंतर आता त्यांनी पोस्ट करत हे काम करणारा कंत्राटदार आणि त्यांच्या संस्थांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. याआधी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री मा. नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने हि प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते. आता हे काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List