बदलापुरातील 36 आंदोलकांना जामीन मंजूर; उल्हासनगर तालुका बार असोसिएशनने खटला विनामूल्य लढवला
बदलापुरात 20 ऑगस्ट रोजी उसळलेल्या जनप्रक्षोभात पोलिसांनी अटक केलेल्या 36 जणांना उल्हासनगरच्या प्रथम न्याय दंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला आहे. त्यातील दहा जणांची सुटका झाली असून उर्वरित 26 जणांचीही सुटका होणार असल्याची माहिती आंदोलकांचा खटला विनामूल्य लढणारे अॅड. प्रवीण अटकाळे यांनी दिली.
बदलापुरात उसळलेला जनप्रभोक्ष ही जनतेच्या मनातील चीड होती. त्यामुळे आंदोलकांच्या पाठीशी उभे राहणे आमचे कर्तव्य होते. महाराष्ट्रात अशी घटना कोठेही घडली तरी आम्ही आंदोलकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी प्रतिक्रिया अॅड. प्रवीण अटकाळे यांनी दिली.
20 ऑगस्ट रोजी बदलापूर शहरात शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांविरोधात झालेल्या आंदोलनाने अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. आंदोलकांनी तब्बल आठ तास रेल रोको आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी 1200 जणांवर गुन्हे दाखल केले. त्यातील 36 जणांना अटक करण्यात आली होती. या आंदोलकांचे खटले विनामूल्य लढण्याचा निर्धार उल्हासनगर तालुका बार असोसिएशनने केला. त्यानुसार अॅड. प्रवीण अटकाळे, अॅड. उमेश केदारे, अॅड. संजय सोनवणे, अॅड. जय शिरसाठ, अॅड. प्रियेश जाधव, अॅड. महेश माळवे यांनी उल्हासनगर प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयात आंदोलकांची बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने दहाजणांना जामीन मंजूर करून त्यांची 15 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. उर्वरित 26 जणांनाही जामीन मंजूर झाला असून त्यांचीही सुटका होणार आहे.
बदलापुरात राजकीय पक्षांच्या दहीहंड्या नाहीत
दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घृणास्पद घटनेमुळे यंदा बदलापूरमध्ये दहीहंड्या रद्द करण्याचा निर्णय सर्व राजकीय पक्षांनी घेतला आहे. तसे मेसेजच राजकीय पक्षांनी प्रसारमाध्यमांमधून व्हायरल केले आहेत.
प्रशासकांनी शाळेचा ताबा घेतला
भाजप आणि रा. स्व. संघाच्या आदर्श विद्या प्रसारक मंडळाच्या आदर्श विद्या मंदिर या शाळेचे संचालक मंडळ सरकारने बरखास्त केले आहेत. या संचालक मंडळात भाजपचे अंबरनाथचे जिल्हाध्यक्ष व शाळेचे सचिव चेतन आपटे, अध्यक्ष उदय कोतवाल यांचा समावेश होता. मात्र आता शाळेचा ताबा प्रशासकांनी घेतला आहे. या नवीन प्रशासकांमध्ये जिल्हा शिक्षण अधिकारी, पंचायत समिती अधिकारी आणि नाईक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांचा समावेश आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List