बदलापूरचे आंदोलन राजकीय वाटणे विकृत मानसिकता; उद्धव ठाकरे यांनी मिध्यांची सालटी काढली

बदलापूरचे आंदोलन राजकीय वाटणे विकृत मानसिकता; उद्धव ठाकरे यांनी मिध्यांची सालटी काढली

बदलापूरमध्ये अत्यंत विकृत घटना घडली. या दुष्कृत्याविरोधात, विकृतीविरोधात जो उद्रेक उसळला, ते आंदोलन राजकीय वाटणे म्हणजे विकृत मानसिकता आहे. या दृष्कृत्यामागे किंवा त्याचा निषेध करण्यामागे राजकारण आहे असे वाटत असेल तर ते सगळे विकृत आणि नराधमाचे पाठीराखे आहेत, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची सालटी काढली. गुरुवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

बदलापुरात घडलेल्या दुष्कृत्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि इतर सर्वपक्षांनी 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. हा बंद राजकीय नाही. कोरोना काळात आपण एखाद्या कुटुंबाप्रमाणे या विषाणूविरोधात लढलो होतो. तशीच वेळ पुन्हा आली असून या विकृतीचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रातील बांधवांनी, माताभगिनींनी उस्फुर्तपणे बंद पाळावा. शाळेमध्येही मुली सुरक्षित नसतील तर ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ या वाक्याला काहीही अर्थ राहणार नाही. माझ्या माताभगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे ही भूमिका सर्वच राजकीय पक्षांची असली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. यावेळी त्यांनी अत्याचाराशी घटनांशी संबंधीत बातम्यांची कात्रणं दाखवत याची दाहकता स्पष्ट केली.

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथेही अशाच प्रकारची घटना घडली आणि देशभरात आगडोंब उसळली. तत्पूर्वी निर्भायाकांड घडलेले. त्यावेळीही देश खडबडून जागा झालेला. तशीची ही घटना असून सहनशिलतेचा अंत होतो तेव्हा जनभावनेचा उद्रेक होतो. कोरोना विषाणूसोबत लढलो तसाच हा विकृतीचा विषाणू आहे, असे म्हणत महाराष्ट्र बंदमध्ये कोणताही राजकीय अभिनिवेश नाही हे देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असे वातावरण निर्माण झाले पाहिजे की कुणीही असे कृत्य करायला धजावला नाही पाहिजे. विकृतांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी हा बंद आहे. माझ्या बहिणीच्या, माता-भगिनींच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे, असेही ते म्हणाले.

सुरक्षित बहीण ही प्राथमिकता असायला हवी. बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण सारख्या अनेक योजना आणता येतात. काही वर्षांपूर्वी एक कविता लिहिण्यात आलेली. उठो द्रौपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे. याचा अर्थ तुझ्या रक्षणासाठी कुणी येणार नाही असे कविने सूचवलेले आहे. ही कविता आजच्या परिस्थितीत चपखल बसते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. बदलापूरमध्ये ही घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री कुठे होते? राज्यभर या घटनेचा निषेध होत असताना मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये हात पसरून बसले होते, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी हातात बांधलेल्या राखीच्या बंधनाला जागावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

बदलापूरचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते असा आरोप करणाऱ्यांवरही उद्धव ठाकरे यांनी आसूड ओढला. एखाद्या घटनेचा निषेध करणे राजकारण कधीपासून वाटायला लागले? निषेधही करायचा नाही का? लोकसभेच्याआधी विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक यांची हत्या झाली. त्यावेळीही जबाबदारी झटक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धटपणे विधान केले होते. गाडीखाली कुत्रे आले तरी तुम्ही राजीनामा मागणार का? असे ते म्हणाले. याचा अर्थ तुम्हाला जनतेच्या जिवाची किंमत नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे –

  • बदलापूर घटनेतील मुलीची आई गर्भवती असून तिला 10-12 तास खोळंबून ठेवले. तिची तब्येत बरी नसून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. हे नक्की कुणाचे सरकार आहे? हे नराधमांचे सरकार आहे का?
  • घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगावे की ते नराधमाच्या बाजुने आहे की विरोधात आहेत. काल त्यांनी तिथे पोहोचायला हवे होते. पण ते रत्नागिरीमध्ये अर्धा डझन मंत्री, एसटी गाड्या घेऊन डामडौलात बसले होते. पैसे देऊन गर्दी करायची आणि रेकून रेकून भाषण ठोकायची.
  • कपडे रंगेबीरंगी घालायचे, राख्या बांधून घ्यायच्या, योजनामागून योजना आणायच्या आणि जनतेच्या खऱ्या व्यथा वेदनांकडे दुर्लक्ष करायचे. हे असंवेदनशील सरकार असून या उद्रेकामध्ये राजकावण वाटत असेल तर असे बोलणारे विकृत आहेत.
  • पोलीस आयुक्त कुठे आहेत? त्यांनी सांगावे की त्यांच्यावर दबाव होता की नव्हता. खरे तर पोलीस असे वागत नाहीत, पण त्यांच्यावर दबाव आणला गेला असेल तर दबाव आणणारे आणि दबावाखाली काम करणारे पोलीस हे नराधमाएवढेच गुन्हेगार असून त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे.
  • मुख्यमंत्र्यांनी एका आरोपीला दोन महिन्यांपूर्वी फाशी दिल्याचे म्हटले. त्याबद्दल एसआयटी नेमा आणि कोणाला फाशी दिली, कोणती घटना होती त्याची माहिती काढावी.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;