आरक्षण द्या नाहीतर भाजपचे उमेदवार मुळागाळासकट उखडून फेकू; मनोज जरांगे यांचा इशारा
छगन भुजबळ यांचं ऐकून कितीही त्रास दिला तरी मराठे तुम्हाला पुरून उरतील. ओबीसीतून मराठय़ांना आरक्षण द्या, अन्यथा विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार मुळागाळासकट उखडून फेकल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
नाशिक येथे मंगळवारी शांतता रॅलीच्या समारोपाप्रसंगी मध्यवर्ती बसस्थानक चौकात जाहीर सभेत ते बोलत होते. कोणत्याही नेत्यासाठी किंवा पक्षासाठी नाही, तर फक्त ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी लढायचंय असे सांगून मनोज जरांगे पाटील यांनी भाषणाला सुरुवात केली. फक्त आठ उमेदवार निवडून आणून दाखव, असे आव्हान मला देता, तुमच्या जिह्यातले तरी निवडून येतील का हे बघा, माझ्या नादाला लागू नका, एकदाच लागला तेव्हा प्रचारासाठी तुम्हाला नाशिकसुद्धा सोडू दिलं नाही, असा टोला त्यांनी छगन भुजबळ यांना हाणला. पुढे ते म्हणाले, यावेळी येवल्याला लागलेला डाग धुतला जाईल, येवल्याचं नाव पवित्र होईल. शेवटी मराठा आरक्षणाच्या विरोधात जाणारा कोणीही असला तरी त्याचा कार्यक्रम लागतोच, असे सूनावले. यावेळी भुजबळांचा पराभव कराच, असे आवाहन केले. जेलमध्ये जाण्याची भीती वाटत असल्याने ते फडणवीस यांच्या इशाऱ्याने आमच्याविरुद्ध बोलत आहेत, त्यांच्याप्रमाणेच मराठा आरक्षणाविरोधात बोलणाऱ्या आमदारांचीही द्विधामनस्थिती झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करताना ते म्हणाले, त्यांनी सगळ्यांना पाणी पाजलं, पण मी त्यांना वस्ताद भेटलोय. माझ्याबाबत काय करायचं हे त्यांना सूचेनासं झालंय. आरक्षण द्यायचं सोडून त्यांनी मला उघडं पाडण्याचं षङ्यंत्र रचलं आहे. मराठा समाजाला तुम्ही संपवायला निघालात, तुम्हाला पाणी पाजायला वेळ लागणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List