मिसिंग लिंकचा उद्घाटन सोहळा मिंधे सरकारकडून ‘मिस’ होणार, प्रकल्प पूर्णत्वासाठी अधिकाऱ्यांवर दबाव
विधानसभा निवडणुकांपूर्वी समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा, मेट्रो रेल्वे आणि इतर प्रकल्पांच्या उद्घाटनांची महायुती सरकारला घाई लागली आहे. प्रलंबित सर्व प्रकल्प पूर्ण करून उद्घाटनाचे श्रेय पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीच्या मंत्र्यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकचे उद्घाटन सप्टेंबर महिन्यात करण्याची योजना महायुती सरकारने आखली होती; पण कामे शिल्लक असल्याने मिसिंग लिंक पुढील वर्षीच्या मे महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे मिसिंग लिंकचा उद्घाटन सोहळा महायुती सरकारकडून ‘मिस’ होणार असल्याचे चित्र आहे.
असा आहे मिसिंग लिंक प्रकल्प
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली ते पुसगावदरम्यान नवीन मार्गिकेचे (मिसिंग लिंक) काम होत आहे. एक्स्प्रेस वेवर 13.3 किमी लांबीचा मिसिंग लिंक प्रकल्प हा मुंबई-पुणे प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या अंतर्गत 1.67 किमी व 7.92 किमी लांबीचे दोन बोगदे आहेत. या मिसिंग लिंकवर 180 मीटर उंचीचा सर्वात उंच पूल आणि सर्वात जास्त रुंदीचा बोगदा बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे लोणावळा, खंडाळा परिसरातील वाहतूककाsंडी दूर होणार असून प्रवासाच्या वेळेत आणि महागड्या इंधनात बचत होणार आहे. मुंबई-पुणे अंतर तेरा किलोमीटरने कमी होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मुंबईतील विकास प्रकल्पांचे उद्घाटन महायुती सरकारने उरपून घेतले. या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गेले. आता लवकरच विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रकल्पांचे उद्घाटन करून घेण्याची महायुती सरकारला घाई लागली आहे. त्यामध्ये सर्वात दोन मोठय़ा प्रकल्पांचा समावेश आहे. त्यातील पुलाबा सीप्झ मेट्रो रेल्वे आणि नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्याची योजना आहे. समृद्धी महामार्गाचा संपूर्ण टप्पा सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून उद्घाटन होणार आहे. मिसिंग लिंकचेही सप्टेंबरमध्ये उद्घाटन करण्याची योजना होती. त्यादृष्टीने मंत्र्यांनी पाहणी दौरेही केले होते. पण मिसिंग लिंकवरील दोन पुलांपैकी एका पुलाचे काम 80 ते 85 टक्के पूर्ण झाले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील सहा किमीचे रुंदीकरण बाकी आहे. एक पूल टायगर व्हॅलीमधून जातो. या दरीमध्ये केबलस्टेड पूल बांधण्यात येणार आहे. पाऊस आणि वारा यामुळे हे काम अतिशय आव्हानात्मक आहे. त्यामुळे संपूर्ण मिसिंग लिंकचे काम मे 2025पर्यंत पूर्ण होईल असे सरकारी अधिकारी सांगतात.
उद्घाटन झाल्यावर शिल्लक कामे करा
हे प्रकल्प आचारसंहितेपूर्वी पूर्ण करण्यासाठी सरकारचा सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे. त्यामुळे सरकारी अधिकारीही मेटापुटीला आले आहेत. प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आवश्यक असलेली कामे पूर्ण करून घ्या. आचारसंहितेपूर्वी उद्घाटन एकदा पार पडल्यावर उरलेली लहान-लहान कामे करा अशा सूचना मंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात येते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List