महाराष्ट्र लुटायला बसलेल्यांसोबत समझौता नाहीच… आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
”जे राज्य लुटायला निघाले आहेत. जे राज्यातून सर्व उद्योग गुजरातला नेत आहेत त्यांच्यासोबत काय चर्चा करायची आहे. त्य़ामुळे महाराष्ट्र लुटायला बसलेल्यांसोबत समझौता नाहीच. कधीच नाही’, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदारा आदित्य ठाकरे यांनी मिंधे गटाला फटकारले आहे. मुंबई तकने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी ही भूमिका मांडली. तसेच घटनाबाह्य मुख्यमंत्री व त्यांच्या चाळीस चोरांना पळवल्याशिवाय मी राहणार नाही, असा निर्धार देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
”लोकसभा निवडणूकीनंतर देशाला वेगळा श्वास मिळाला. लोकांना वाटत होतं की ते संविधान बदलू शकतात. यांनीच संविधानाला बाजूला ठेवून महाराष्ट्रात आपल्या डोक्यावर बेकायदेशीर सरकार बसवलं आहे. हे सगळं होत असताना कमीत कमी देशाने हे दाखवलं की तुमच्या विरुद्ध भाजप उभा असो, सगळ्यात जास्त , इलेक्ट्रोल बॉ्डस असलेला पक्ष उभा असो, ईडी सीबीआय असो तरी देखील आम्ही कुणाच्या डोक्यात मस्ती जाऊ देत नाही. काही ठिकाणी गडबडी झाल्या. या गडबडी नसत्या झाल्या तर इंडिया आघाडीचं सरकार सहा महिन्यानंतर बसणार आहे ते आताच बसलं असतं. चारशे पार जाणार असं जे सांगत होते ते 272 पण घेऊ शकत नाही. ही त्यांची हारच आहे. हा विजय नाही. तो दावा करणाऱ्या नेत्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. आता सध्या मूळ मुद्दा हा आहे की देशात विरोधी पक्ष समोर आहे. गेली दहा वर्ष विरोधी पक्षात आवाज नव्हता. कुठे ना कुठे यात बॅलन्स येणं गरजेचं होतं. प्रत्येक राजकीय पक्षाचा आवाज तिथे ऐकणं गरजेचं असतं. हा देश फक्त दिल्लीतून चालणारा नाहीए. त्यामुळे आता विरोधी पक्षाचा देखील आवाज ऐकला जाणार. भाजपला ज्यांच्यायासोबत जावं लागलं आहे. ते जितनराम मांझी, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान यांचे पक्ष कुठे हिंदुत्व वादी पक्ष आहेत का? त्यामुळे भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असे आदित्य ठाकरे यांनी भाजपला ठणकावले.
”दक्षिण मुंबईत आम्ही चांगल्या फरकाने जिंकलो आहोत. मुंबईत २० मे ला मतदान झालं. तेव्हा आपला मराठी टक्का कुठे होता. हे सुट्ट्यांचे दिवस आहेत. मोठा वर्ग गावी होता. तुम्ही कितीही मतांनी जिंका.जर मताधिक्य पाहायचं असेल तर ते वाराणसीचं पाहावं. स्वत:प्रधानमंत्री बहुमतांचं सरकार चालवत होतं. जेवढं केंद्रीकरण त्यांच्या सत्तेत झालं तेवढं कधीही झालं नव्हते. ते प्रधानमंत्री मतमोजणीत तिनदा पिछाडीवर होते. विश्वगुरु पिछाडीवर का होते, नाराजी का आहे त्यांच्याबद्दल, अयोध्येत ते का हरले हा देखील प्रश्न आहे. वरळी मतदारसंघाचं म्हणाल तर हा मतदारसंघ मी सोडू शकत नाही. तिथे अजून बरंच काम बाकी आहे. आम्ही सरकारमध्ये असताना तिथे वेगाने काम करत होतो. बीडीडीचा पहिला टप्पाचं चावी वाटप लवकरच होईल. जास्तीत जास्त विकासाची कामं पूर्णत्वाला आली आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
वक्फ बोर्डाबाबतच्या भूमिकेविषयी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, मी हे नेहमी सांगत राहिन. आमचं हिंदुत्व घरातील चूल पेटवणारं आहे. भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. वक्फ बोर्डाचं बिल त्यांनी संसदेत लपून छपून मांडलं. लेयिंगच्या वेळी सगळ्यांनी बसणं गरजेचं नसतं. आमचं स्पष्ट म्हणनं आहे हे जेपीसीकडे जाऊ दे. त्यावर देशभरात चर्चा चर्चा झाली पाहिजे. वक्फ बोर्डाबद्दल बोलतोय पण केदारनाथ बद्दल काय? स्वत: शंकराचार्यांनी सांगितले आहे की तिथलं 300 किलो सोनं गायब झालेलं आहे त्याचं काय? अयोध्येत जी गळती लागली आहे त्याचं काय? अयोध्येच्या आजुबाजुला लोढांनी घेतलेली जी जमीन आहे. त्यांनी जी हजारो एकर जागा घेतली आहे. ती कशासाठी घेतली आहे? वायरमध्ये एक बातमी आली आहे दोन तीन लोकांना आणि अदानी समुहाला तिथे जागा मिळाली आहे ती जागा आर्मी ट्रेनिंगची जागा आहे. ती जागा डीमोटीफाय करून या उद्योजकांना दिली गेली. भाजप केदारनाथ धाम, अयोध्येवर भाजप का बोलत नाहीए. आज सेबीवरचा हिंडेनबर्गचा रिपोर्ट आलाय त्यावरप चर्चा का होत नाही. एकविरा देवी तिथे आमचं सरकार असताना. काही सोयी सुविधा करत होतो, अनेक देवस्थानांमध्ये आम्ही कामं सुरू केलेली त्याला या सरकारने स्थगिती दिली. ही काही धार्मिक कामं नाही का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List