शीव पूल बंद झाल्याने मुंबईकरांचा कोंडमारा
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा शीव रेल्वे स्टेशनजवळील 122 वर्षे जुना पूल तोडण्याचे काम सुरू करून ते थांबवण्यात आल्याने या पुलाचे भवितव्य अधांतरी आहे. पूल पाडायलाच चालढकल केली जात असेल तर तो नव्याने बांधायला किती काळ लागेल, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्याचवेळी हा पूल बंद केल्याने ऐन सणासुदीत दादर ते शीव भागात जीवघेणी वाहतूककोंडी होत असून या गंभीर प्रश्नावर शिवसेना नेते व स्थानिक खासदार अनिल देसाई यांनी आवाज उठवला आहे. नवे तंत्रज्ञान वापरून या पुलाची लवकरात लवकर पुनर्बांधणी करावी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी अनिल देसाई यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
शीव येथील रेल्वेमार्गावरील पूल 31 जुलैपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे पूर्वेकडून पश्चिम उपनगरात जाणाऱया सर्वच वाहनांना शीव रुग्णालयाजवळून वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे शीव रुग्णालय जंक्शनवर वर्दळीच्या वेळी प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. वडाळा, प्रतीक्षानगर, अँटॉप हिल, धारावी, दादर, माटुंगा, माहीम तसेच दक्षिण मुंबईत जाणाऱया सर्वच वाहनांची या कोंडीत घुसमट होत असून या भागातील रस्त्यांवर सध्या वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत.
चाकरमानी व कामधंद्यानिमित्त प्रवास करणाऱ्या सर्वांनाच या कोंडीचा फटका बसत आहे. शीव ते दादर भागात अनेक शाळा, महाविद्यालये व प्रमुख शैक्षणिक संस्था असून हजारो विद्यार्थ्यांना वाहतूककोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. आर्थिक भुर्दंड तर पडतोच आहे, शिवाय 15 ते 20 मिनिटांच्या प्रवासाला एक ते सवा तास लागत आहे.
रेल्वे प्रशासन, वाहतूक पोलीस व संबंधित यंत्रणांनी या वाहतूककोंडीवर तातडीचा तोडगा काढण्याची आवश्यकता असून आपण या गंभीर प्रश्नात लक्ष घालावे, अशी विनंती अनिल देसाई यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांना केली. त्याचवेळी संबंधित पूल आणि वाहतूककोंडीचे फोटोच देसाई यांनी रेल्वेमंत्र्यांना सादर केले आहेत.
पाडकाम का थांबवले?
31 जुलैपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानंतर पाडकाम सुरू झाले, मात्र हे काम परत थांबवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशी चालढकल केल्यास हा पूल नव्याने बांधून खुला होण्यास बरीच वर्षे लागतील अशी भीती सर्वांनाच वाटत आहे. हे लक्षात घेता नवे तंत्रज्ञान वापरून या पुलाची शक्य होईल तितक्या लवकर पुनर्बांधणी करावी व रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी विनंती देसाई यांनी निवेदनात केली आहे. त्याची दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक पावले उचलण्याची ग्वाही दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List