नागाचा सूड अन् नंतर दिलेले जीवदान; जाणून घ्या नागपंचमीची कथा…

नागाचा सूड अन् नंतर दिलेले जीवदान; जाणून घ्या नागपंचमीची कथा…

>> योगेश जोशी

श्रावणातील व्रतवैकल्यांचा महत्त्वाचा भाग म्हणजे कथा किंवा त्या व्रताची कहाणी. श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी सण असतो. नागदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही. कोणतेही खोदकाम करत नाही. तसेच घरात महिला तव्यावर काही भाजत नाही, तळत नाही. कापत नाही, शिवत नाही, असे काही नियम या व्रतासाठी पाळण्यात येतात. आता हे निमय पाळण्यामागे नागपंचमीची कहाणी आहे. जाणून घेऊया नागपंचमीची कहाणी…

आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता.त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावणमास आला. नागपंचमीचा दिवस होता. शेतकरी नेहमीमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता वारूळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला, त्यामुळे ती मेली. काही वेळाने नागीण तिथं आली.आपलं वारूळ पाहू लागली.तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला. या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली. या शेतकऱ्याचा निर्वंश करत बदला घेण्याचा निर्णय तिने घेतला. ती शेतकऱ्याच्या घरी गेली. त्याच्या मुला-बाळांना, लेकीसुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्या विषाने सर्वजण मरून पडले. त्यानंतर नागीणीला समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे, तिलाही दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली.

तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या मुलीने पाटावर नागीण व त्यांची नऊ नागकुळं काढली आहेत.त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाला लाह्या, दूर्वा वगैरे वाहिल्या आहेत. पूजा पाहून नागीण संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. मुलीला म्हणाली, बाई, बाई तू कोण आहेस ? तुझे आई-बाप कोठे आहेत ? आवाज ऐकून मुलीने डोळे उघडले. नागीण समोर पाहून ती घाबरली. नागीण म्हणाली, बाई भिऊ नकोस. विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे. तिने सारी हकीकत सांगितली.ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटले.

ही आपली भक्तीभावाने पूजा करत आहे, आपलं व्रत पाळत आहे. हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं आपण ठरवले, ते योग्य नाही, असा विचार करत नागिणीने तिला घडलेली हकीकत सांगितली. मुलीला फार वाईट वाटलं. मग तिने आई-वडिल जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिणीने तिला अमृत आणून दिले. ते घेऊन ती माहेरी आली.तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं. सर्व मंडळी जिवंत झाली.सगळयांना आनंद झाला.

तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली.तेव्हा त्यांनी विचारले, हे व्रत कसं करावं ? मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की, इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा.तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. जशी नागीण त्यांना प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

अशी कथा नागपंचमीची पौराणिक कथा म्हणून प्रसिद्ध आहे. या कहाणीत सांगितल्याप्रमाणे नागपंचमीचे व्रत केले नाही. तरी या दिवशी शेत नांगरणे, खोदकाम करणे, शिवणे, कापणे, तळणे अशी गोष्टी टाळल्या जातात. मात्र, या मागे साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तसेच या काळात पावसामुळे साप बिळाबाहेर आलेले असतात. त्यांना विषारी समजून त्यांची हत्या करण्यात येते. जैवविविधता साखळी कायम राहावी, तसेच सर्व साप विषारी नसून काही बिनविषारी आणि उपयुक्त असतात. या हेतूने आपल्या संस्कृतीत या व्रताला स्थान मिळाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे फक्त कहाणी सांगणे, हा हेतू नसून यामागे निसर्ग आणि जैवविविधतेचा उदात्त विचार आपल्या संस्कृतीने केला होता, असे दिसून येते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;