खूशखबर! म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी लॉटरी, उद्यापासून अर्ज नोंदणी; 13 सप्टेंबरला निकाल

खूशखबर! म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी लॉटरी, उद्यापासून अर्ज नोंदणी; 13 सप्टेंबरला निकाल

म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. म्हाडातर्फे मुंबईतील 2030 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. गोरेगाव, मालाड, जुहू, अॅण्टॉप हिल, पवई, कन्नमवार नगर, ताडदेव अशा विविध ठिकाणी असलेल्या या घरांच्या किमती 30 लाखांपासून ते साडेसात कोटी रुपयांपर्यंत आहेत. या घरांच्या विक्रीतून तब्बल 2100 कोटी रुपये म्हाडाच्या तिजोरीत जमा होणार आहेत. इच्छुक 9 ऑगस्टला दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज नोंदणी करू शकतात, तर घरांची संगणकीय सोडत ऐन गणेशोत्सवात म्हणजेच 13 सप्टेंबरला पार पडणार आहे.    

खासगी विकासकांच्या घराच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेक जण म्हाडाच्या सोडतीची आतुरतेने वाट पाहतात. अखेर सर्वसामान्यांची प्रतीक्षा आता संपली असून म्हाडाने सोडतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी 9 ऑगस्ट दुपारी 12 वाजल्यापासून 4 सप्टेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत करता येईल. ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती 4 सप्टेंबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत केली जाणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी 9 सप्टेंबरला, तर स्वीकृत अर्जांची अंतिम यादी 11 सप्टेंबरला प्रसिद्ध केली जाईल. संगणकीय सोडत 13 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता काढण्यात येईल.

सर्वसामान्यांसाठी कमी घरे 

यंदाच्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी सर्वात कमी घरे असल्याने सर्वसामान्यांची निराशा झाली आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी 359, अल्प उत्पन्न गटासाठी 627, मध्यम उत्पन्न गटासाठी 768, तर उच्च उत्पन्न गटासाठी 276 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय म्हाडाने बांधलेली 1327, पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून म्हाडाला मिळालेल्या 370 तसेच मागील सोडतीतील विखुरलेल्या 333 घरांचादेखील समावेश आहे.

असा करा अर्ज 

सोडतीत सहभागी होण्याकरिता Mhada Housing Lottery System या नावे मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच अर्जदार https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या संकेतस्थळावरदेखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अत्यल्प उत्पन्न गटासाठी सहा लाखांपर्यंत, अल्प उत्पन्न गटासाठी नऊ लाखांपर्यंत, मध्यम उत्पन्न गटासाठी बारा लाखांपर्यंत, तर उच्च उत्पन्न गटासाठी बारा लाखांहून अधिक आहे.

अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.

 अल्प उत्पन्न गटाचे घर दीड कोटीपर्यंत 

मिळालेल्या माहितीनुसार, अत्यल्प उत्पन्न गटातील घराच्या किमती अंदाजे 30 ते 40 लाख, तर अल्प उत्पन्न गटातील घराच्या किमती अंदाजे 50 लाख ते दीड कोटीपर्यंत असणार आहे. दरम्यान, हाऊसिंग स्टॉकच्या माध्यमातून मिळालेली काही घरे दक्षिण मुंबईत असल्याने या घरांच्या किमती कोटय़वधीमध्ये आहेत.  त्यामुळे अल्प उत्पन्न गटातील अर्जदाराला दीड कोटींचे घर कसे परवडणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे, तर पंतप्रधान आवास योजनतील घरांच्या किमती 32.36 लाख असून गेल्यावेळच्या लॉटरीपेक्षा दोन लाखांनी महागले आहेत. मध्यम उत्पन्न गटातील घराच्या किमती अंदाजे 75 लाख ते 2 कोटीपर्यंत, तर उच्च उत्पन्न गटातील घराच्या किमती अंदाजे सवा कोटी ते साडेसात कोटी रुपयांपर्यंत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;