मुद्दा – वास्तूची गॅरंटी घेतली आहे का?
>> सीमा श्रीराम शास्त्री मोडक
‘गॅरंटी’ शब्द सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. बऱयाच दुकानांत लिहिलेले असते, ‘कोणत्याही मालाची गॅरंटी नाही.’ असा माल,सामान आपण घेतो का? मला वाटतं, नाही. बहुतेक वेळा कापड दुकानात आपण हे पाहतो की, दुकानदार ज्या कापडाची गॅरंटी घेत नाही ते कापड आपण घेत नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांना आपण ज्याचे पैसे देतो त्याची गॅरंटी असेल तरच ती वस्तू, माल, सामान आपण प्राधान्याने खरेदी करतो.
अगदी शंभर रुपयांच्या आत असणाऱया बल्बवरसुद्धा आपण दुकानदाराकडून एक्सपायरी डेट लिहून घेतो. फॅन, मिक्सर या वस्तूंपासून ते टीव्ही, फ्रीज, एसी यांसारख्या महागडय़ा वस्तूंचे गॅरंटी कार्ड आपण त्यांची गॅरंटी संपल्यानंतरही जपून ठेवतो. या सगळ्यांचा आपण इतका विचार करतो. खरं तर या वस्तू आपल्याला जीवनात दोन-तीन वेळा घ्याव्या लागतात. कारण त्यांची गुणवत्ता मर्यादित आहे. मग जे घर किंवा जी वास्तू आपण एकदाच बांधतो किंवा घेतो, लाखो रुपये देऊन बांधतो, काही जण तर कर्ज काढून घर बांधतात, तर काही आपल्या आयुष्याची पुंजी लावून स्वतःच्या मालकीचे घर बांधतात. घरासाठी जागा पाहतानाही आपण खूप विचार करतो. एवढेच नाही तर घर बांधताना लागणारी प्रत्येक बाब वाळू, सिमेंट, विटा, लाकूड, टाइल्स इत्यादी बऱयाच बाबी दुकानात जाऊन, भाव, गुणवत्ता पाहूनच खरेदी करतो.
शेवटची पायरी म्हणजे घर बांधकाम कोणाला द्यायचे हेही आपण अनेकांचा सल्ला घेऊन ठरवतो. मग जर एवढय़ा सगळ्या बाबींचा आपण सखोल विचार करतो, तर ज्याला घर बांधायला सांगितले त्याच्याकडून घराच्या बांधकामाचे, लाकडी फर्निचरची, टाइल्सची गॅरंटी घ्यायला नको का? लाखो रुपये खर्च केल्यानंतरही घराची दारे, खिडक्या, चौकट किती वर्षे व्यवस्थित राहतील? घराचा रंग किती टिकेल? घराच्या टाइल्स किती वर्षे व्यवस्थित राहतील? हे लेखी घ्यायला नको का?
अगदी तारीख, महिना नसला तरी साधारण बांधकाम झाल्यानंतर किमान पाच-दहा वर्षांची गॅरंटी असावी.
बऱयाच वेळा वास्तू झाल्यानंतर दुसऱया, तिसऱया वर्षीच स्लॅब गळायला लागतो. टाइल्स वर येतात. लाकडी दारे, खिडक्यांना फटी पडतात. अशा वेळी एवढा खर्च करूनही आपल्याला पुन्हा खर्च करावा लागतो. म्हणून इंजिनीअर किंवा त्या त्या संबंधित व्यक्तींकडून आपण गॅरंटी लिहून घेतली पाहिजे. गॅरंटी लिहून घेतली असली म्हणजे वास्तू मालक निर्धास्त असतो आणि संबंधित व्यक्तीही आपल्या कामाची गुणवत्ता समोरच्याला दाखवू शकते. अर्थात ती गॅरंटी लिहून घेताना इंजिनीअरने आणि वास्तू मालकानेदेखील दोघांच्या सामंजस्याने नियम व अटी लिहूनच घ्याव्यात. अगदी घराप्रमाणेच ऑफिस, कार्यालय, दुकाने, हॉटेल्स इत्यादी प्रत्येक वास्तूची गॅरंटी आपण संबंधित व्यक्तींकडून घ्यायला हवी. त्या वास्तूमधील पीओपी, फर्निचर, नळ कनेक्शन, इलेक्ट्रिक कनेक्शन्स इत्यादी सगळ्या महागडय़ा बाबींची संबंधित व्यक्तींकडून आपण गॅरंटी घ्यायलाच हवी. कारण या बाबी पुनः पुन्हा होत नाहीत.
त्यामुळेच आपण आपल्या वास्तूची गॅरंटी घ्यायला हवी आणि निर्धास्त राहायला हवे.
(मुख्याध्यापक, डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List