नीरज चोप्राची ‘सुवर्ण बचाव मोहीम’आजपासून; पात्रता फेरीतच छाप सोडण्यासाठी उत्सुक
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास घडविणारा हिंदुस्थानचा भालाफेकपटू नीरज चोप्रा उद्यापासून (दि. 6) पॅरिस ऑलिम्पिकमधील आपल्या मोहिमेस प्रारंभ करणार आहे. या ‘गोल्डन बॉय’च्या पात्रता फेरीतील कामगिरीवर तमाम देशवासीयांच्या नजरा असतील. 8 ऑगस्टला भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे.
तीन वर्षांपूर्वी ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी क्रीडाप्रेमींना सुवर्णक्षणाची अनुभूती देणारा नीरज चोप्रा याच्याकडून देशवासीयांना पुन्हा सुवर्णपदकाची आशा आहे. मात्र, मांडीच्या आतील स्नायू दुखावला गेल्याने नीरज पूर्ण हंगामात त्रस्त होता. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये त्याचा भाला 90 मीटरपर्यंत पोहोचतो की नाही, याबाबत साशंकता आहे. सलग दुसऱया ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक राखण्यात यशस्वी ठरल्यास अशी कामगिरी करणारा नीरज हा ऑलिम्पिक इतिहासातील पाचवा भालाफेकपटू ठरणार आहे. शिवाय दोन वैयक्तिक सुवर्णपदके जिंकणारा पहिलाच हिंदुस्थानी खेळाडू ठरेल.
ऑलिम्पिकच्या पुरुष भालाफेक स्पर्धेत स्वीडनचा एरिक लेमिंग (1908 व 1912), फिनलॅण्डचा जोन्नी माइरा (1920 व 1924), झेक प्रजासत्ताकचा जॅन जेलेंजी (1992 व 1996) व नॉर्वेचा ऑण्ड्रियास टी. यांनी सुवर्णपदक राखण्यात यश मिळविले होते. झेक प्रजासत्ताकचा जॅन जेलेंजी हा नीरज चोप्राचा आयडॉल खेळाडू आहे. आपल्या आयडॉलच्या पावलावर पाऊल टाकण्यात नीरज यशस्वी होतो की नाही, हे बघावे लागेल. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भालाफेक करीत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर दोहा डायमंड लीगमध्ये त्याने 88.36 मीटर भालाफेक केली होती. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झेक प्रजासत्ताकचा याकूब वालेश, जर्मनीचा ज्युलियन वेबर व माजी जगज्जेता ग्रेनाडाचा. अॅण्डरसन पीटर्स यांच्याकडून नीरजला आव्हान मिळणार आहे. हिंदुस्थानचा किशोर जेना हादेखील या शर्यतीत असेल. त्याने गतवर्षी आशियाई स्पर्धेत 87.54 मीटर भालाफेक केली होती. मात्र, त्यानंतर त्याला कधीच 80 मीटरपर्यंतही भालाफेक करता आली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List