पदकाचे ‘लक्ष्य’ चुकलेच! पहिला गेम जिंकूनही लक्ष्य सेन पराभूत
बॅडमिंटनमध्ये पदकाच्या स्वप्नांचा चुराडा झाला. एकमेव पदकाचे लक्ष्यही चुकले. बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आघाडीवर होता. पहिला गेम जिंकून सुस्तावल्यासारखा खेळ करणारा सेन दुसऱया गेममध्ये पदकाच्या लक्ष्यापासून असा दूर गेला की, त्यालाही इतरांप्रमाणे चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मलेशियन झी जिआ लीने जबरदस्त कमबॅक करत लक्ष्य सेनचा
13-21, 21-16, 21-11 असा पराभव केला आणि कांस्यपदकावर आपले नाव कोरले. लक्ष्यच्या या पराभवामुळे बॅडमिंटनमध्ये हिंदुस्थानची 12 वर्षांपासूनची पदक जिंकण्याची परंपरा खंडित झाली.
हिंदुस्थानी पथकाला नेमबाजीनंतर सर्वाधिक पदकाची अपेक्षा बॅडमिंटनमध्ये होती आणि त्या खेळातील शेवटचे आशास्थान असलेल्या लक्ष्य सेनने आज घोर निराशा केली. काल उपांत्य फेरीच्या सामन्याप्रमाणे लक्ष्यने आजही सनसनाटी सुरुवात करत पदकाच्या दिशेने स्मॅश मारायला सुरुवात केली होती आणि पहिला गेम 21-13 असा जिंकलासुद्धा. लक्ष्यची सुरुवात पाहून हिंदुस्थान बॅडमिंटनमध्ये इतिहास घडवणार हे स्पष्ट झाले होते.
सेनचे लक्ष्यच भरकटले
हा कांस्यपदकाचा सामना असला तरी हा सामना खऱया अर्थाने मलेशियन लीनेच गाजवला. आधी संथ खेळणाऱया लीने दुसऱया सेटमध्ये आपला खेळ चौथ्या गिअरवर टाकला आणि लक्ष्यच्या सर्व हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत त्याच्या डोळय़ासमोरून विजय आपल्या बाजूने फिरवला. दुसऱया गेममध्ये लक्ष्यने लीला झुंजवले असले तरी तिसऱया गेममध्ये त्याचे लक्ष्यच भरकटले. हाताला झालेल्या दुखापतीकडे वारंवार लक्ष पेंद्रित करणारा सेन मागे पडला. अर्धवेळेत लीने 11-6 अशी आघाडी घेतली तेव्हाच लक्ष्यचे पदक हुकले होते. पुढे लीच्या खेळापुढे लक्ष्यचे काहीएक चालले नाही आणि लीने हा गेम 21-11 असा सहज खिशात घालत पदकाचेही चुंबन घेतले.
हिंदुस्थानचे बॅड ऑलिम्पिक
बॅडमिंटनमध्ये दोन-तीन पदकांची अपेक्षा होती. सर्वात मोठी अपेक्षा पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीकडून होती. मात्र, ही जोडी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातच हरली आणि पदकाचे स्वप्न संपुष्टात आले. त्यानंतर गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि कांस्य जिंकणाऱया सिंधूवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. पण तिचा कारभारही उपउपांत्यपूर्व फेरीतच आटोपला. त्यानंतर शेवटची आशा लक्ष्य सेनवर होती; पण आधी तो उपांत्य फेरीत हरला आणि मग आज कांस्यपदकाच्या लढतीतही पराभूत झाला. परिणामतः गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा हा खेळ झीरो ठरला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List