उद्योगपतींना मुंबई विकली जाऊ नये ही आमची भुमिका, धारावीवरून संजय राऊत यांचा घणाघात
धारावीत लोकांना घरं मिळावीत, धारावी पुर्नविकासाविरोधात आम्ही नाही अशी भुमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे. तसेच उद्योगपतींना ही मुंबई विकली जाऊ नये अशी आमची भुमिका आहे असेही राऊत म्हणाले.
आज माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, धारावी हा मुंबईसाठी महत्त्वाचे घनमैदान झालेले आहे. धारावीतल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना पाचशे स्के.फुटाची घरं मिळावीत. धारावीच्या पुर्नविकासाच्या प्रकल्पाना विरोध असल्याचे कारणच नाही. ही घरं मिळावीत म्हणून शिवसेनेने मोर्चा काढला होता. पण हा प्रकल्प चुकीच्या हातात जाऊ नये आणि या प्रकल्पातून महाराष्ट्र आणि मुंबईची लूट होऊ नये, या प्रकल्पातून उद्योगपतींना मुंबई विकली जाऊ नये ही आमची भुमिका आहे. धारावीच्या लोकांचं पुर्नवसन तिथेच व्हायला हवं असे राऊत म्हणाले.
धारावीत अठरा पगड जातीचे लोक राहतात. धारावीत आठ लाख लोकांच्या राहण्याचा प्रश्न आहे. धारावीत पाचशे एकरच्या वर ही जमीन आहे. त्याबदल्यात संबंधित बिल्डरला फार मोठे चटई क्षेत्र मिळणार आहे. आणि हा संपूर्ण प्रकल्प फायद्यात आहे. असे असताना धारावी पुर्नवसनच्या नावाखाली संबंधित लाडक्या बिल्डरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी ही चौकडी मुंबईतल्या मोक्याचे 20 भुखंड त्यांना देत आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला.
या जागांमध्ये मदर डेअरीची जागा, मुलुंड डम्पिग ग्राऊंड टोल नाका, दहिसर टोल नाका, वडाळ्याची मिठागरं या जमिनी राखीव आहेत. या जमिनी धारावीच्या नावाखाली घशात घालणार असाल तर हा धारावी पुनर्वस प्रकल्प नसून ही लुटमार योजना आहे. धारावीच्या लोकांना आधी तिथेच घरं वाढवून द्या नंतर व्यवहाराचं बोला असेही राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List