बांगलादेशात सरकारची दडपशाही, विरोधी पक्षातील 9 हजार नेत्यांना टाकले तुरुंगात
बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आंदोलन सुरू झाले आहे. हे आंदोलन रोखण्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या सरकारने दडपशाही सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसांत 10 हजारांहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) 9 हजार नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. सरकार आपल्या राजकीय उद्देशासाठी विरोधी नेत्यांना खोट्या खटल्यांत अडकवत आहेत, असे विरोधी पक्षांतील नेत्यांनी म्हटले आहे.
कोटा दुरुस्तीच्या मागणीसाठी 1 जुलैपासून सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनाने 18 जुलैपर्यंत हिंसक रूप घेतले. यानंतर बांगलादेशची राजधानी ढाक्यासह देशभरातील शिक्षण संस्थांमध्ये तणाव आहे. 16 जुलैपासून देशातील प्राथमिक विद्यालये, कॉलेजसह सर्व शैक्षणिक संस्था आतापर्यंत बंद आहेत. त्या पुन्हा कधी उघडतील हे सांगता येत नाही. राजधानी ढाक्यात शुक्रवारी आंदोलकांनी विद्यार्थ्यांवरील क्रौर्य आणि हिंसाचारासाठी हसिना यांनी देशाची माफी मागण्याचे आवाहन केले.
दुसरीकडे विद्यार्थ्यांनी गृहमंत्री आणि शिक्षणमंत्र्यासह हसिना सरकारमधील 6 मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आंदोलन भडकवण्यासाठी बीएनपी-जमातीचे नाव समोर आले आहे. जाळपोळीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बीएनपी आणि जमातचे नेते, कार्यकर्ते दिसत आहेत. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांनी पोलिसांच्या हत्येसाठी 7 हजार रुपये, तर अवामी लीग विद्यार्थी कार्यकर्त्यांच्या हत्येसाठी 3500 रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोपसुद्धा केला जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List