साहित्य जगत – भांड्याकुड्यांशी नातं

साहित्य जगत – भांड्याकुड्यांशी नातं

>> रविप्रकाश कुलकर्णी

महिलांचं भांड्याकुड्यांशी नातं अतूट असतं. कालमानाप्रमाणे ते बदलत राहतात. काही विस्मृतीतही जातात. मात्र ती मनात रूतून बसलेली असतात. मग तो कावळा असेल, घागर, तपेली, पोहरा, डेग, सतेलं, शकुन तिवली, गाळणी, चाळणी, रोळी, किसणी, ओगरली, निळवं, कोळवं, चिपटं, मापटं, शेर, पायली…अशी कितीतरी भांडी. याबद्दल चित्कला कुलकर्णी यांनी. ‘माझा भांडी प्रपंच’ मांडला असून सदर पुस्तक कोल्हापूरच्या रावा प्रकाशनने प्रकाशित केलं आहे.

भातुकलीची बोळकी मिळाली,

परवा भांडी लावताना,

माझी किती धांदल उडाली

गतकाळामागे धावताना

चंद्रशेखर गोखले यांच्या या चारोळीप्रमाणे अवस्था झालेली आहे असं लेखिका म्हणते, तर ‘चमचा तू आमचा…’ असं म्हणताना त्या कुसुमाग्रजांची कविता उधृत करतात…

चमच्याच्या स्टॅंडवर सात चमचे होते

एक चमचा एक दिवशी गहाळ झाला

प्रथमच अनावर हुंदका फुटला

ती असती तर, ते उदगारले, तो हरवला नसता…

खरं आहे मित्रांनो, ती असती तर मी हरवलो

नसतो…

अशा वेगवेगळ्या भांड्यांच्या निमित्ताने लेखिकेला मराठी साहित्यातील, लेखनातील उदाहरणं आठवतात. मग त्यात गोविंदाग्रज यांच्यापासून बहिणाबाई ते माडगूळकर यांची उदाहरणं त्या देतात. शेवटी गदिमांनी म्हटल्याप्रमाणे ‘घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे’ हेच खरं! म्हणूनच लेखिका म्हणते, ‘ही सारी भांडी आपल्यासोबत तत्त्वज्ञान, संस्कृती, संगीत, आठवणी अशा बऱ्याच गोष्टी घेऊन येतात.’ यामध्ये लेखिका ‘पाडवा गोड झाला’ या कथेची आठवण काढतात. अंबादास शं. अग्निहोत्री यांच्या या कथेची त्यांना आठवण येते हे विशेष म्हटलं पाहिजे.

या भांड्यांसोबत माहिती सांगताना लेखिकेची काही निरीक्षणं मार्मिक आहेत. पोळपाट-लाटणं या संबंधात लिहिताना त्या सांगतात, ‘एक वेळ पोळपाटाशिवाय ओट्यावरच पोळी लाटली जाते, पण लाटणं हवंच नाहीतर काम ठप्प. महिलांना आपलं स्वतचंच लाटणं हाताळायची सवय असल्याने पापड किंवा पोळ्या लाटण्यासाठी एकमेकीकडे मदतीला जाताना स्वतचं लाटणं घेऊन जातात. कारण त्या दुसऱ्या लाटण्याचा हातात जम बसायला वेळ लागतो.’

लेखिका एका ठिकाणी सांगते, ‘भाजी फळं चिरण्यासाठी लागते ती सुरी वा विळी. अगदी प्राचीन काळापासून भाजी चिरण्यासाठी सुरी वापरत. विराट राजाकडे भीम जेव्हा आचार्याच्या वेषात गेला तेव्हा त्याच्या हातात भाजी चिरण्यासाठी सुरी असल्याचा उल्लेख वाचायला मिळतो. बसून भाजी चिरायला मात्र हवी विळीच!’

जेवताना तूप वाढलं जातं त्या भांड्याला तिवली म्हणतात. शकुन तिवली असं पण म्हणतात. त्यातूनच पुढे शकुंतला भांडं असं नामांतर झालं. त्याबाबत लेखिका म्हणते, ‘अतिथी देवो भव या भावनेने प्रसन्न चित्ताने तूप वाढणे हा शुभ शकुन मानत. शकुन तिवलीतून तूप वाढलं की अतिथी जेवणाचा आस्वाद घेत आणि तृप्त मनाने अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद देत.’

वेगवेगळ्या गोष्टी ज्या मापातून पूर्वी देत त्यात निळवं, कोळवं, चिपटं, मापटं, शेर, अडशेरी, पायली अशी नावं होती. हे सांगून लेखिका पुढे सांगते, ‘धान्य मोजण्याची भांडी इतर कारणांसाठी वापरली जातात. लग्नानंतर नवी नवरी जेव्हा सासरच्या घरात पहिलं पाऊल ठेवते ते उंबऱ्यावरचं माप ओलांडूनच. याला घरभरणी असंही म्हणतात. येणाऱ्या गृहलक्ष्मीच्या कर्तृत्त्वाने घर समृद्ध होवो हीच त्यामागची भावना.’

या मापाचा आणखी एक उपयोग म्हणजे मान अवघडल्यानंतर मानेखाली हे माप ठेवून झोपलं की, मानेचे स्नायू मोकळे होऊन बरं वाटतं. पण याचा सांस्कृतिक संदर्भ कुठे आला आहे हे माहीत आहे का? लेखिका सांगते, ‘तिरुपतीला व्यंकटेशाचे बंधू श्री गोविंद स्वामीचे मंदिर आहे. तुमच्यापैकी काही जणांनी ते पाहिलंही असेल. पण या गोविंद स्वामीमधली विशेष गोष्ट लक्षात आलीय का? गोविंद स्वामीच्या उशाला मापटं आहे! हे मापटं का? तर व्यंकटेशाच्या लग्नात स्वामी इतके दमले की, ते मापटं उशाला घेऊन झोपले.’ या गोष्टीकडे कुलकर्णी बाईंनी लक्ष वेधलं ही या पुस्तकाची विशेष बाब. तिरुपतीला जाणाऱयांना तरी ही गोष्ट सांगितलीच पाहिजे.

स्मृती विस्मृतीत गेलेल्या भांड्यांविषयी वाचताना वाचकांनाही भांड्यांविषयी नक्की काहीतरी आठवेल, सांगावंसं वाटेल हे या पुस्तकाचं यश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;