बाबाजी दाते महिला अर्बन बँकेत कर्ज घोटाळ्यात ईडी कारवाई करणार का? कर्जदारांकडे अडीच अब्ज रुपयांची थकबाकी
>> प्रसाद नायगावकर
संघ परिवाराशी निगडित असलेल्या आणि दिवाळखोरीत निघालेल्या येथील बाबाजी दाते महिला अर्बन बँकेत कर्ज वाटपात झालेल्या घोळात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. बँकेची 156 कर्जदारांकडे तब्बल 2 अब्ज 41 कोटी 50 लाख 46 हजार 26 रुपयांची थकबाकी असल्याचे आता पुढे आले आहे. एवढेच नव्हेतर अनेक कर्जप्रकरणे बनावट नोंदी घेत मंजूर केल्याचेही लेखा परीक्षकांच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. आता या प्रकरणात ईडी कारवाई करणार का, असा प्रश्न करण्यात येत आहे.
राजकीय सूडाने ही कारवाई केल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. याआधी जनतेला ईडीचे नावही माहीत नव्हते. आता ईडी हा शब्द देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. महाराष्ट्र,पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगढमध्ये विरोधी पक्षांच्या सरकारमधील प्रमुख नेत्यांवर छापे टाकण्यात आले. त्यांची चौकशी करण्यात आली. काहींची तुरुंगात रवानगी करण्यात आली. गेल्या वर्षी इंडियन एक्स्प्रेसने केलेल्या पाहणीत 2014 नंतर आठ वर्षात नेत्यांवर ईडीद्वारे कारवाई करण्याचे प्रमाण चार पटींनी वाढले आहे. या कालावधीत 121 राजकीय नेते चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. यापैकी 115 विरोधी पक्षाचे नेते आहेत. या कालावधीत 95 टक्के विरोधी पक्ष नेत्यांवर कारवाई झाली आहे, असा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. आता यवतमाळ महिला बँकेच्या कर्ज घोटाळ्यात ईडीला साक्षत्कार कधी होणार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला बँकेवर सध्या प्रशासक आहेत. यापूर्वी बँक डबघाईला आल्याने रिझर्व बँक ऑफ इंडियाने तेथील व्यवहार थांबविले होते. त्यानंतर अल्पावधीतच बँकेला दिवाळखोरीत काढण्यात आले. शिवाय येथील साहाय्यक जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले. त्यांनी अनेक थकीत कर्जाची रक्कम कर्जदाराच्या गहाण स्थावर मालमत्तेतून वसूल केली. असे असले तरी अद्याप 156 कर्जदारांकडे गेल्या अनेक वर्षांपासून 2 अब्ज 41 कोटी 50 लाख 46 हजार 26 रुपयांची थकबाकी आहे. या 156 कर्जदारांना 1 अब्ज 57 कोटी 78 लाख 22 हजार 670 रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी व्याजाचा भरणा न केल्याने ती रक्कम सुमारे अडीच अब्ज रुपयांपर्यंत पोहोचली. 15 दिवसांपूर्वी अमरावती येथील लेखापरीक्षक पांडे यांनी त्यांचा अंकेक्षण वजा चौकशी अहवाल सादर केला. त्यामध्येही गंभीर बाब पुढे आली आहे. शिवाय अनेकांची गहाणातील मालमत्ता बाजार भावापेक्षा कमी असताना त्यापेक्षा जास्त कर्ज मंजूर करण्यात आले. बनावट नोंदी घेत अनेक कर्जप्रकरणे मंजूर केल्याचेही स्पष्ट झाले आहे. लेखा परीक्षकांनी अहवालात तशा कर्जाच्या नोंदी घेतल्या आहे. शिवाय प्रत्येक थकबाकीदाराकडे कर्जाची मुद्दल रक्कम, त्यावर आतापर्यंत झालेले व्याज आणि बनावट नोंदीवरील कर्जाला जबाबदार बँकेच्या अधिकाऱ्यांची नावेही त्यामध्ये नमूद केली आहे.
कर्जाची रक्कम बघता आणि बनावट नोंदी घेत अनेक कर्जप्रकरणे मंजूर केल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता सुमोटो घेऊन ईडीने कारवाई करावी आणि गुंतवणूकदारांची मुद्दल व्याजासह परत द्यावी, अशी मागणी होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List