मिलिंद मोरे यांची हत्येनंतर विरारमधील बेकायदा रिसॉर्टवर बुलडोझर; दहा जणांना अटक
शिवसेना ठाणे उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांचा टोळक्याच्या हल्ल्यात रविवारी मृत्यू झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. वसई – विरार महापालिकेचे प्रशासन खडबडून जागे झाले असून ज्या सेव्हन सी बीच रिसॉर्टजवळ हा हल्ला झाला ते रिसॉर्टच आज बुलडोझर लावून जमीनदोस्त करण्यात आले. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी दहा जणांना अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख मिलिंद मोरे हे रविवारी आपल्या कुटुंबासह नवापूर येथील सेव्हन सी बीच या रिसॉर्टमध्ये गेले होते. तेथून परतताना एका रिक्षाचालकाने मोरे यांच्या पुतण्याला घडक दिली. त्याचा जाब रिक्षाचालकाला विचारल्यानंतर नवापूर गावातील टोळके काही वेळातच रिसॉर्टजवळ आले व त्यांनी मिलिंद मोरे यांच्यासह त्यांचा भाऊ व अन्य दोन मित्रांवर हल्ला केला. तसेच त्यांना बेदम मारहाण केली. त्यात मोरे यांच्या छातीला जोरदार मार बसताच ते खाली कोसळले व त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
मिलिंद मोरे यांच्यावरील हत्येप्रकरणी आज रिक्षाचालक राहुल घुटुकडे यांच्यासह ज्ञानेश्वर मेहेर, सचिन मेहेर, रमेश मेहेर, मनीष मेहेर, दत्तात्रय मेहेर, हेमेश मेहेर, कुणाल मेहेर, नारायण मेहेर, विनायक मेहेर यांना अटक करण्यात आली. या सर्वांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
मिलिंद मोरे यांचे आज सकाळी ठाण्याच्या चंदनवाडी येथील घरी पार्थिव आणण्यात आले. जवाहरबाग स्मशानभूमीत दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी तसेच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
कठोर शिक्षा करा
मिलिंद मोरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करा अशी मागणी शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्याशीही चर्चा केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List