वेष पालटून काय फिरताय, तोंड दाखवायला लाज वाटते का? संजय राऊत यांचा खणखणीत टोला
दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीसाठी मी वेष बदलून विमानातून प्रवास केला असा खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी गद्दार गटांना व भाजपला फटकारले आहे. ”अजित पवार वेष पालटून दिल्लीत फिरायचे. एकनाथ शिंदे काळी दाढी पांढरी करून फिरत राहिले. देवेंद्र फडणवीस वेष पालटून फिरतात… यांना स्वत:चे तोंड दाखवायला लाज वाटते का? वेष पालटून काय फिरताय, तोंड दाखवायला लाज वाटते का? अशा शब्दांत संजय राऊत यांनी त्यांचा समाचार घेतला.
सोमवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपात तथ्य असून त्यांच्याकडे आलेल्या समित कदम याला गृहमंत्रालयाने Y दर्जाची सुरक्षा का दिली आहे असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला. ”महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ अनिल देशमुख यांनी जो खुलासा केला आहे की त्यांना फडणवीसांनी एक मध्यस्थ पाठवला. अनिल देशमुख यांना मिरजेचा एक लायझनिंग करणार समित कदम नावाचा माणून भेटला. त्या मध्यस्थाने सांगितले की आम्ही तुम्हाला तीन प्रतिज्ञापत्र देतो त्यावर सह्या करा तरच तुम्हाला अटक करणार नाही. सदर सद्गृहस्थ अनिल देशमुखांना भेटत राहिला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार यांच्यावर आम्हाला हवे ते आरोप करा. ते जर तुम्ही केले नाही तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. अशा प्रकारची धमकी त्यांना देण्याचं काम फडणवीसांनी केलं. मी त्यांना यासाठीच खलनायक म्हणतो. ते या राज्याच्या राजकारणातील खलनायक आहेत. हा सर्व प्रकार गंभीर आहे. राजकीय दबावाला जे झुकले नाही ते तुरुंगात गेले, जे झुकले दे भाजपसोबत गेले. फडणवीस टोळी म्हणेल की आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही. समित कदमला आम्ही ओळखत नाही. तुम्ही ओळखत नाही मग त्या समित कदमला व्हाय दर्जाची सुरक्षा का आहे. गृहमंत्र्यांनी त्यांना ही सिक्युरिटी का दिली? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला. तसेच संजय राऊत यांनी फडणवीस व समित कदम यांचे फोटो पत्रकार परिशदेत दाखवले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List