मणिपुरात घडले ते महाराष्ट्रात होण्याची भीती; शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता
मणिपूरमध्ये गेल्या अनेक पिढय़ांपासून दोन समाज एकत्र गुण्यागोविंदाने नांदत होते. मात्र आता ते एकमेकांच्या जिवावर उठले आहेत. त्यांनी एकमेकांची घरे जाळली, शेती उद्ध्वस्त केली. हीच मणिपूरसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते की काय याची भीती वाटू लागली आहे, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केली.
वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये ऐक्य समता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला संबोधित करताना शरद पवार म्हणाले की एकसंध समाज, एकसंध राष्ट्र ही संकल्पना घेऊन आणि एकत्र येऊन काम करण्याची सध्या गरज आहे. हेच मोलाचे काम या परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे जाणे आवश्यक होते. मात्र ते तिथे गेलेच नाहीत. त्यामुळे परिस्थिती भयानक बनली असे टीकास्त्र पवार यांनी सोडले.
मणिपूरसारखी स्थिती अनेक राज्यांमध्ये निर्माण झाली आहे. महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती वाटते. मात्र सुदैवाने महाराष्ट्राला युगपुरुषांचा वारसा आहे. या युगपुरुषांनी देशाला आणि समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे फूट पाडणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पडला आहे. साडेतीनशे वर्षांमध्ये देशात अनेक राजे होऊन गेले. मात्र कर्तृत्ववान राजे म्हणून फक्त शिवाजी महाराजांचे नाव पुढे येते. मोघलांचे आणि यादवांचे राज्य त्यांच्या स्वतःच्या नावाने ओळखले जाते. शिवाजी महाराजांचे राज्य मात्र रयतेचे राज्य असे संबोधले जाते. महाराष्ट्राला वैचारिक विचारांचा वारसा आहे, अशी शरद पवार यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, रोहित पवार आदी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List