लेख – महाराष्ट्राने देशाचा इतिहास बदलवला
>> डॉ. सदानंद मोरे, [email protected]
ज्या वेळी चीनचं आक्रमण झालं, तेव्हा कृष्ण मेनन यांना संरक्षण पदावरून हटवण्याचं काम सुरू होतं, पण त्यांच्या जागी योग्य माणूस कोण? तर महाराष्ट्राचे त्या वेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्री करण्यात आले. म्हणून ‘हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला’ असं म्हटलं जाऊ लागलं. ही मोठी परंपरा आहे. महाराष्ट्र हा सतत देशाचा विचार करणारा प्रांत आहे. यामध्ये कधी कधी महाराष्ट्र राज्याचा स्वतःचा तोटा होतो. अनेक गोष्टी महाराष्ट्राने तडजोड केल्या आहेत. त्याचा मलिदा इतरांनी खाल्ला. भारताच्या जडणघडणीमध्ये महाराष्ट्राचा वाटा आहे.
आपल्याकडे खूप मोठे इतिहासकार होऊन गेले. राजारामशास्त्री भागवत, श्रीधर व्यंकटेश केतकर. भागवत यांनी असा सिद्धांत मांडला की, उत्तरेतून नाही तर दक्षिणेतूनच लोक वरती गेले. म्हणजे यादव हे मुळात महाराष्ट्रातलेच आणि ते उत्तरेत गेले व त्यांनी आपआपली राज्ये स्थापन केली. त्याचा परिणाम हा भाषेवर झाला. जसं महाराष्ट्र प्राकृतचा त्या त्या भाषेवर प्रभाव पडून तिथल्या भाषा विकसित झाल्या. त्याचे मूळ म्हणजे मराठी. प्राकृत भाषेचे मूळ महाराष्ट्रात आहे. देशाची जडणघडण करण्यात महाराष्ट्राचा वाटा खूप मोठा आहे. भाषिक जडणघडण करण्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा आहे. हे झालं प्राकृतच्या बाबतीत, पण संस्कृतच्या बाबतीतही महाभारत काळापासून ते बुद्धकाळापर्यंत जो इतिहास आहे, तो सांगण्याचा एकमेव स्रोत म्हणजे गुणाध्याय यांनी लिहिलेली बृहतकथा. मगधाची राजधानी पाटलीपुत्र. ते नगर कोणी वसवलं त्याचा पुरावा या बृहतकथेत आपल्याला मिळतो. ज्यानुसार आपल्या तारापूरजवळ चिंचणी नावाचं गाव आहे, तिथला एक ब्राह्मण मगधाला गेला आणि त्यानं पाटलीपुत्र वसवलं. ही केवढी मोठी ऐतिहासिक घटना आहे. तिथून साम्राज्य झालं. हे सगळं महाराष्ट्रातल्या लोकांचे कर्तृत्व आहे असे केतकर यांनी सांगितले आहे. म्हणून निश्चितपणे मराठय़ांचे कर्तृत्व त्याच्याही अगोदर आहे.
साहित्यशास्त्राचा विकास हा महाराष्ट्र प्राकृतमुळे झाला. नाहीतर झालाच नसता. म्हणजे अनेक बाबतींत महाराष्ट्र प्राकृतचे अनुकरण केलेले दिसते. त्यामुळे संस्कृतकार जी चांगली चांगली उदाहरणं देतात ती त्यांना महाराष्ट्र प्राकृतमधील ग्रंथांमधून मिळतात. अशा प्रकारे महाराष्ट्राचे योगदान फार पूर्वीपासून आहे. अजून पुढे मौर्याचे राज्य असतानाच सातवाहन याचंही राज्य तयार झालं, त्याचंही खूप मोठं राज्य होतं. सातवाहन यांनी जे शक होते त्यांचा पराभव केला. परकीयांना हाकलून लावण्यात महाराष्ट्र हा आघाडीवर आहे. त्याच सातवाहनांच्या काळात महाराष्ट्र प्राकृतला मोठं स्थान मिळालं.
मोगल आणि नंतर इंग्रजांपासून भारताला वाचवायचं काम मराठय़ांनी केलं. महाराष्ट्र हा भारताचा संरक्षक आहे. मराठय़ांना एकटं पाडलं, पण मराठे हटले नाहीत. त्यांनी मुकाबला केला, पण काही आकस्मिक गोष्टींमुळे मराठे पानिपतमध्ये हरले. पण त्यांनी अब्दालीला असा धडा दिला की, त्याने पुन्हा स्वारी नाही केली. इथे प्रचंड प्रतिकार होऊ शकतो म्हणून तोही घाबरला आणि त्याने पंजाबचा प्रांत द्या अशी मागणी केली. तुम्ही पूर्ण भारतावर राज्य करा, पण ही त्याची मागणी मराठय़ांनी मान्य केली नाही. पुन्हा अब्दालीचा पराभव करून दिल्लीचं तख्त ताब्यात घेतलं. ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांचा बंदोबस्त केला, धडा शिकवला. बादशहा जो इंग्रजांच्या आश्रयाला गेला, त्याला वाटलं आपल्याला इंग्रज इथे बसवतील, पण ते शक्य झालं नाही. महादजी शिंदे उत्तरेत गेले. त्यांनी बादशहाला ताब्यात घेतलं. भारताचा कारभार महादजी शिंदे पाहत होते. ते दिल्लीत गेले नसते तर अब्दालीने भारत जिंकला असता. त्याने नसता जिंकला तर इंग्रजांनी जिंकला असता. कारण दोघांचाही डोळा होता. अफगाणला त्यांनी हाकलून लावलंच, पण नंतर जी सत्ता स्थापन झाली 1802नंतर, त्याच्या अगोदर इंग्रजांनी दिल्ली जिंकली असती. त्यामुळे अगोदर मोगल आणि नंतर इंग्रजांपासून भारताला वाचवायचं काम मराठय़ांनी केलं आहे. म्हणून दिल्लीचे तख्त राखतो असं म्हटलं आहे.
नंतर इंग्रज आले. त्या वेळी स्वातंत्र्याची चळवळ झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातील लोक अग्रभागी होते.1857च्या उठावात झाशीची राणी, तात्या टोपे यांनी खूप शर्थीने प्रयत्न केले, पण नाही जमले. पण त्यानंतर इंग्रजांना हटवणं शक्य नाही असं म्हणून भारतातील लोक सुस्त झाले होते. त्या समजुतीला छेदायचं काम लोकमान्य टिळक यांनी केलं. लोकमान्य हे भारतव्यापी पहिले नेते आहेत. संपूर्ण भारताने त्यांचे नेतृत्व मान्य केलं असे टिळक होते, ही गोष्ट महत्त्वाची आहे. टिळकांमुळे भारतीय स्वातंत्र्य लढा पुढे गेला. असंतोषाचे जनक त्यांना म्हटलं गेलं, ते याच कारणामुळे.
पुढे जाऊन आपण ज्याला गांधीवाद असं म्हणतो त्याची मांडणी विनोबा भावे, आचार्य जावडेकर यांनी केली आहे. या सगळ्यांनी गांधीवादाला तत्त्वज्ञानाचे स्वरूप दिलं. गांधीजी असं म्हणायचे, भारतातले सगळे लोक जरी माझ्या बरोबर नाही आले तरी मी महाराष्ट्रातले लोक सोबत घेऊन स्वराज्य मिळवून दाखवेन. स्वातंत्र्य मिळालं. भारतातील सुधारणेचा मुकुटमणी म्हणतो असे महात्मा जोतिराव फुले, काँग्रेसची स्थापना करण्यात अग्रभागी होते ते न्यायमूर्ती रानडे, हेपण महाराष्ट्राने दिलेले आहेत. आपण स्वतंत्र झालो त्याला घटना देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. स्वतंत्र भारताची आर्थिक घडी बसविण्याचे काम व नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष चिंतामणराव देशमुख यांनी केलं.
काकासाहेब गाडगीळ, सी.डी. देशमुख आणि कोठारी कमिशनला मदत करणारे जे.पी. नाईक यांनी शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान दिलं. त्या त्या ठिकाणी महाराष्ट्रातले लोक अग्रभागी होते. इतकंच नव्हे तर डाव्या लोकांची चळवळ सुरू झाली, ती तेलंगणामध्ये सुरू झाली. त्या वेळी जमिनी वाटपाचा प्रश्न निर्माण झाला होता, अशा वेळी विनोबा भावे पुढे आले. त्यांनी भूदान चळवळ उभी केली, त्यांनी हिंसक लोकांचा प्रभाव नष्ट केला. हे मोठे काम आहे महाराष्ट्राचे.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी फुटीर संस्थानांचा बंदोबस्त केला. बरीच संस्थानं होती ज्यांचा इरादा होता की, भारतात सामील व्हायचं नाही, पण सरदार पटेल यांनी फुटीर संस्थानांचा बंदोबस्त केला. पटेल यांना मदत करण्यात सगळ्यात पुढे कोण होतं तर काकासाहेब गाडगीळ. अशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल की, भारतात मोठं योगदान महाराष्ट्र राज्याचे आहे.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)
शब्दांकनः मेधा पालकर
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List