फडणवीसांच्या कपटाचा पर्दाफाश, अनिल देशमुखांच्या आरोपाने भूकंप; उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना बोगस प्रकरणात अडकवण्यासाठी दबाव
तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी रचलेल्या कपटाचा आज पर्दाफाश झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना बोगस प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी फडणवीस यांनी आपल्यावर दबाव आणला होता, असा धक्कादायक आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. त्यासाठी खोटी प्रतिज्ञापत्रे बनवावीत म्हणून त्यांनी दडपणही आणले होते, असे सांगतानाच, हा केवळ आरोप नाही तर त्याचे ठोस पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावाही देशमुख यांनी केला. तसेच फडणवीसांचे पुटील कारस्थान जगासमोर आणणार, असा इशाराही त्यांनी दिला.
अनिल देशमुख यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विश्वासातील एका व्यक्तीला आपल्याकडे पाठवले होते. चार मुद्दय़ांवर खोटी प्रतिज्ञापत्रे बनवून दिल्यास कोणतीही कारवाई होणार नाही, अशी ऑफर त्याच्यामार्फत फडणवीस यांनी दिली होती. ती व्यक्ती अनेकदा आपल्याकडे आली होती आणि तिने फडणवीस यांच्याबरोबर बोलणे करून दिले होते, असेही देशमुख यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि मी गृहमंत्री होतो त्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना आपल्यावर शंभर कोटी गोळा केल्याचा खोटा आरोप करायला लावला. त्या प्रकरणी कारवाई न करण्यासाठी फडणवीस यांनी ही खोटी प्रतिज्ञापत्रे देण्यास सांगितले होते; परंतु आपण त्यास नकार दिला, अशी माहितीही अनिल देशमुख यांनी या वेळी दिली. पुढील चार मुद्दय़ांवर फडणवीसांनी प्रतिज्ञापत्रे बनवून मागितली होती, असे ते म्हणाले.
1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री म्हणून मला ‘वर्षा’ निवासस्थानी बोलावले आणि सांगितले की, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यासाठी मला पैशांची गरज आहे, आपण मला तीनशे कोटी रुपये जमा करून द्या.
2. पोलिसांकडून गृह मंत्र्यांना मिळालेल्या माहितीनुसार सुशांत सिंह राजपूत याची आधीची मॅनेजर दिशा सालियान हिच्या पार्टीला आदित्य ठाकरे गेले होते. तिथे आदित्य ठाकरे यांनी ड्रिंक घेतल्यावर दिशावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने आरडाओरड करायला सुरुवात केली तेव्हा आदित्य यांनी तिला बाल्कनीतून खाली फेकले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.
3. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील कार्यालयात मंत्री म्हणून मला बोलावून घेतले. तिथे त्यांचा मुलगा पार्थ पवार उपस्थित होता. महाराष्ट्रात गुटखा आणि पानमसाल्याचा मोठा धंदा आहे. त्यांच्याकडून आपल्याला पैसे वसुली करायची आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पैसे वसुलीचे काम पार्थ पवार करतील. तुम्ही फक्त गृह मंत्री म्हणून त्यांना मदत करा.
4. तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी गृहमंत्री म्हणून मला सांगितले की, दापोलीच्या साई रिसॉर्टमध्ये त्यांचेच पैसे लागलेले आहेत. फक्त कागदोपत्री मालकी सदानंद कदम यांची दाखवण्यात आली आहे. त्या प्रकरणात तक्रार झाली तर गृहमंत्री म्हणून मदत करा.
माझ्याकडेही पुरावे आहेत – फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांबाबत बोलताना, श्याम मानव हे सुपारी घेऊन आरोप करणाऱयांच्या नादी लागले असून अनिल देशमुख यांच्यासंदर्भातील ऑडीओ-व्हिडीओ पुरावे आपल्याकडेही आहेत, असा दावा फडणवीस यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List