संगमनेर शासकीय विश्रामगृहासमोर शेण ओतून राज्य सरकारचा निषेध, ट्रॅक्टर रॅलीस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संगमनेर शासकीय विश्रामगृहासमोर शेण ओतून राज्य सरकारचा निषेध, ट्रॅक्टर रॅलीस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दुधाला प्रतिलिटर 40 रुपये भाव आणि इतर मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी अकोला तालुक्यातील कोतूळ येथून संगमनेर येथील प्रांत कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली काढली. सकाळी कोतूळ येथून निघालेली ही रॅली संगमनेरमध्ये पोहोचल्यानंतर पोलिसांनी शासकीय विश्रामगृहाजवळ रोखली. यावेळी शेतकरी आंदोलकांनी ट्रॅक्टर ट्रॉलीमधून आणलेले शेण विश्रामगृहासमोर ओतून राज्य सरकारचा निषेध केला.

दुधाला प्रतिलिटर 40 रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोतूळ येथे गेले 18 दिवस शेतकरी बेमुदत सत्याग्रहाला बसले आहेत. आंदोलकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे अकोले व संगमनेर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी ‘पंजाब पॅटर्न’चे अनुकरण करीत शेकडो ट्रक्टर एकत्र करून आज जबरदस्त रॅली काढली. कोतूळ ते संगमनेर हे 55 किलोमीटरचे अंतर पार करीत 300पेक्षा जास्त ट्रॅक्टर्स आज संगमनेर शहरात धडकले.

अकोले येथे पोलीस प्रशासनाने रॅली अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संगमनेरला जायचेच, यावर आंदोलक ठाम राहिले. अखेरीस पोलीस प्रशासनानेही आंदोलकांच्या भावना लक्षात घेत रॅलीस सहकार्य केले. संगमनेर येथील मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर्सची लांबच लांब रांग उभी करीत आंदोलकांनी शासकीय कार्यालयासमोर दूध ओतून व ट्रॉलीभर शेण ओतून संताप व्यक्त केला. दुधाच्या आंदोलनाचे केंद्र असलेल्या नगर जिह्यात दुग्धविकासमंत्री राहतात. आंदोलनाच्या 18व्या दिवसानंतरही आंदोलनाची दखल घेतलेली नाही, याबद्दल आंदोलकांनी संतात व्यक्त केला. कोतूळवरून 300पेक्षा जास्त ट्रॅक्टर्स 55 किलोमीटरचे अंतर पार करीत संगमनेरला येऊ शकतात, तर अशीच ट्रॅक्टर रॅली लोणीपर्यंतही निघू शकते. किंबहुना अकोले, संगमनेर व नगर जिह्यातील सर्व संघटना व आंदोलकांना एकत्र करीत ट्रॅक्टर रॅलीचा एल्गार मंत्रालयालाही धडक देऊ शकतो. सरकारने शेतकऱ्यांवर ही वेळ आणू नये, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना निवेदन देण्यात आले. आजच्या आंदोलनानंतरही कोतूळ येथे सुरू असलेले बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असून, आंदोलन तीव्र करण्यासाठी जिह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन पुढील कृती समिती ठरविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व डॉ. अजित नवले, विनोद देशमुख, सदाशिव साबळे, अभिजित देशमुख, नामदेव साबळे, बाळासाहेब गीते, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजित भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव, योगेश बाळासाहेब देशमुख, गौरव बनोटे, सुनील आरोटे, राजेंद्र देशमाने, दीपक पवार आदींनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;