केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून सातव्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या पहिल्याच व्यक्ती ठरतील. आतापर्यंत नरेंद्र मोदी सरकारने उद्योगपतींवरच सवलतींची खैरात केली आहे; परंतु बेरोजगारी, महागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांना अपेक्षित दिलासा मिळालाच नाही. आता तिसऱ्यांदा एनडीए सरकार सत्तेवर आले असून उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सामान्यांना, बेरोजगारांना दिलासा मिळणार का याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
महागाई आटोक्यात आणण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. अनेक आघाडय़ांवर मोदी सरकारला जनतेच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत बसला. आता त्यावर अर्थमंत्री जनतेला कसा दिलासा देतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे. मोदी सरकारला तिसऱ्यांदा सत्तेवर बसण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या कुबडय़ा घ्याव्या लागल्या. यावेळच्या अर्थसंकल्पात त्यांचीही सरकारच्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे काही लोकोपयोगी निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महागाई आणि बेरोजगारी ही दोन मोठी आव्हाने एनडीए सरकारसमोर आहे. गृहिणींच्या किचनचे बजेट साफ कोलडमले असून देशाची अधोगती सुरू असताना यावेळच्या अर्थसंकल्पात कोणता दिलासा मिळतो याकडे देशातील गरीब, मध्यमवर्गीय जनता आणि माता भगिनींचे लक्ष लागले आहे.
2047 पर्यंत सर्वांसाठी विमा हे लक्ष्य गाठण्यासाठी एनडीए सरकार या अधिवेशनात विमा संशोधन विधेयक मांडण्याची दाट शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List