दूधदरप्रश्नी कोतुळ ते संगमनेर उद्या ट्रक्टर रॅलीचे आयोजन
दुधाला प्रतिलिटर 40 रुपये भाव मिळावा, यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून अकोले तालुक्यातील कोतुळ येथे शेतकरी धरणे आंदोलनास बसले असून, दूधहंडी, कोतुळ बंद, शेतकरी मेळावा अशा विविध मार्गांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता संगमनेर तालुक्यातील शेतकऱयांनी दूध आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोतुळ ते संगमनेर अशा 55 कि.मी. ट्रक्टर रॅलीचे आयोजन केले आहे. मंगळवारी (दि. 23) ही रॅली निघणार आहे.
कोतुळ येथील शेतकऱयांच्या आंदोलनाचा 18 दिवस पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 23 जुलै रोजी ट्रक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेर परिसरातील शेकडो शेतकरी ट्रक्टर व ट्रॉलीवर दूध उत्पादनाशी संबंधित विविध साधने सजवून ट्रक्टर रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.
दूधधंद्यातील सर्व उत्पन्न सरकारच्या धोरणामुळे खासगी व सहकारी दूध संघ व इतरांनी लुटून नेले आहे. या पार्श्वभूमीवर दुधाला प्रतिलिटर 40 रुपये भाव मिळावा व दूधप्रश्न कायमचा सुटावा, यासाठी दुधाला एफआरपी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, पशुखाद्याचे दर कमी करावेत, दूध भेसळ तातडीने थांबवावी, आदी मागण्यांसाठी ट्रक्टर रॅली काढण्यात येणार आहे. ट्रक्टर रॅलीच्या सुरुवातीला शेणाने भरलेला ट्रक्टर असणार असून, हे शेणसुद्धा सरकारने घेऊन जावे, अशा प्रकारची भावना याद्वारे व्यक्त केली जाणार आहे. कोतुळ येथून निघणारी ही रॅली दूध उत्पादनाचा पट्टा असलेल्या धामणगाव पाट, धामणगाव आवारी, अकोले तहसील कार्यालय, कळस, चिखलीमार्गे संगमनेर शहरात दाखल होणार आहे.
या रॅलीमध्ये अकोले व संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादकांनी मोठय़ा संख्येने सामील व्हावे, असे आवाहन आंदोलकांच्या वतीने डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, विनोद देशमुख, अभिजीत सुरेश देशमुख, नामदेव साबळे, बाळासाहेब गीते, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजीत भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव, योगेश बाळासाहेब देशमुख, गौरव बनोटे, सुनील आरोटे, राजेंद्र देशमाने, दीपक पवार यांनी केले आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List