चहाविक्रेत्याची लेक झाली CA! 10 वर्षांच्या मेहनतीला मिळालं यश
आई- वडील आपल्या मुलांच्या जन्मापासून त्यांच्यासाठी काबाडकष्ट करतात. आपल्या मुलांनी चांगल शिक्षण घ्यावं आणि यशाचं शिखर गाठावं अशी त्यांची ईच्छा असते. मुलांनी त्यांच्या कष्टाच चीज केलं की आई- वडिलांना प्रचंड आनंद होतो. सीएचा निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी लोकांचे अनेक व्हिडीओ समोर येतात आहेत. मुंबईतील एका भाजीविक्रेत्याच्या मुलाने सीए परीक्षेत यश मिळवले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आता दिल्लीतील एका चहाविक्रेत्याच्या मुलीने देखील सीए परीक्षेत यश मिळवलं आहे.
इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वीच सीएच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. या परीक्षेत दिल्लीची रहिवासी असलेली अमिता प्रजापती सीएची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. तब्बल 10 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर तिने यशाचं शिखर गाठलं आहे. अमिता प्रजापती ही दिल्लीतील एका झोपडपट्टी परिसरात राहणारी मुलगी असून तिचे वडील चहा विक्रेते आहेत.
सध्या सोशल मीडियावर अमिताचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या वडिलांना आपण सीए झाल्याची आनंदाची बातमी दिलीय. यावेळी ती तिच्या वडिलांना घट्ट मिठी मारून रडताना दिसत आहे. अमिताने स्वत: देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘पहिल्यांदा मी वडीलांना मिठी मारून रडले. या क्षणाची मी खूप वाट पाहिली. मी जे स्वप्न पाहिले होते ते आज खरे झाले, मी आज जे काही आहे ते माझ्या आई वडिलांमुळे आहे. त्यांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला, मुलीला शिकवून काय करणार ती एक दिवस सोडूनच जाणार असा विचार त्यांनी कधीच केला नाही’, अशी पोस्ट तिने केलीय.
अमिताने ही सीएची परीक्षा पास होऊन अनेकांना शांत केलंय. अमिताचे पालक गरीब होते. त्यांची आर्थिक परिस्थिती नसतानाही तिच्या वडिलांनी तिला शिकवल. यावेळी अनेक लोकांनी यांना हिणवलं. ‘चहा विकून तू तिला कसं शिकवणार, पैसे वाचवून घर घेऊन टाक, कधीपर्यंत मुलीसोबत रस्त्यावर राहणार. एक दिवस मुलगी लग्न करून सासरी जाईल तुझ्याकडे काहीच राहणार नाही, असे म्हणणारऱ्यांना अमितानं चांगलेच उत्तर दिलं आहे. आता मात्र लोक अमिताचं भरभरून कौतुक करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List