माथेरानमध्ये मित्रानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला, मग व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला!
खोट्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला माथेरानला नेऊन मित्रानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. इतर दोन मित्रांनी अत्याचाराचे मोबाईलमध्ये चित्रण केले. त्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपीसह त्याचा मित्र फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जुलै रोजी अल्पवयीन मुलीचा मित्र आणि त्याचे दोन मित्र तिला खोट्या बहाण्याने माथेरानला घेऊन गेले. चौघेही एकाच परिसरात राहत असून आधीपासून एकमेकांना ओळखतात. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोन दिवस बाहेर जात असल्याचे मुलीने घरी सांगितले.
माथेरानला एका हॉटेलमध्ये नेऊन मुलीच्या मित्राने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तर अल्पवयीन मित्रासह दुसऱ्या मित्राने कथितरित्या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रण केले. यानंतर आरोपींनी 14 जुलै रोजी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल केला.
मुलीच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिल्यानंतर घरच्यांना याबाबत माहिती दिली. पालकांनी या घटनेबाबत मुलीला विचारणा केली असता तिने माथेरानमध्ये आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा केला. घडल्या प्रकारानंतर घाबरुन आपण ही बाब लपवून ठेवल्याचे मुलीने सांगितले. यानंतर मुलीच्या आईने पोलिसात धाव घेत मुलीच्या तीन मित्रांविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तीनपैकी एका आरोपीला अटक केली आहे. मुख्य आरोपीसह दुसरा मित्र अद्याप फरार आहे. पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List