विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच होणार, महाविकास आघाडी हाच चेहरा: नाना पटोले.

विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच होणार, महाविकास आघाडी हाच चेहरा: नाना पटोले.

विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच महाविकास आघाडीची बैठक आयोजित केली जाईल व त्या बैठकीत जागा वाटपाची चर्चा केली जाईल. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच होईल असे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले असून निवडणुकीत महाविकास आघाडी हाच चेहरा राहिल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी खासदार व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महाभ्रष्ट महायुती सरकारने राज्यातील आर्थिक, सामाजिक परिस्थिती बिघडवली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील महत्वाच्या जमिनी अदानीला दिल्या जात आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवून नेले. शेतकरी संकटात आहे, भाजपाच्या राजवटीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून 20 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करत नाही पण उद्योगपती अनिल अंबानी यांचे 1700 कोटी रुपयांचे कर्ज माफ करते, अनिल अंबानी काय सरकारचा जावई आहे का? असा सवाल विचारून सर्वात जास्त बेरोजगारी महाराष्ट्रात आहे. कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. महायुती सरकारने महाराष्ट्राची अधोगती केली आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरु आहे.

भारतीय जनता पक्षानेच 2014 पासून फेक नेरेटिव्ह पसरवले आहे पण भाजपाच्या प्रत्येक फेक नेरेटिव्हला काँग्रेस जशास तसे उत्तर देईल. भारतीय जनता पक्षाला निवडणुकीतच छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. आता विधानसभा निवडणूक असल्याने शिवाजी महाराजांची वाघनखे आणल्याचा देखावा करत आहेत. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत हे इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांनी स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच महापुरुषांचा अपमान भाजपाच्या नेत्यांनी केला. तत्कालीन राज्यपाल कोश्यारी, भाजपाचे मंत्री व नेत्यांनी महापुरुषांचा सातत्याने अवमान केला हे राज्यातील जनता विसरलेली नाही. छत्रपतींचे भव्य स्मारक अरबी समुद्रात करण्याची गर्जना करुन पंतप्रधान मोदींच्या हस्ते जलपूजन केले पण अद्याप स्मारकाची एक वीट रचली नाही. अरबी समुद्रातील शिवस्मारक कधी करणार? याचे उत्तर भाजपाने आधी द्यावे, असेही नाना पटोले म्हणाले.

सारथी, बार्टी मधून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महायुती सरकारने दोन वर्षांपासून फेलोशिप दिलेली नाही. पीएचडी करून काय दिवे लावणार काय? असा अपमान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केला होता. हे सरकार नोकर भरतीही करत नाही, कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती पण सात-आठ महिन्यातच पुन्हा कंत्राटी नोकर भरती सुरु करून भाजपाप्रणित खोके सरकार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

या पत्रकार परिषदेला खा. डॉ. नामदेव किरसान, आ. सुरेश वरपुडकर, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;