वायकर यांच्या खासदारकीला आव्हान; अमोल कीर्तिकर यांची हायकोर्टात याचिका
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली. या याचिकेद्वारे मिंधे गटाचे रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला आव्हान दिले आहे. वायकर यांचा विजय अवैध ठरवून अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करावे, अशी विनंती याचिकेतून केली आहे.
अमोल कीर्तीकर हे ईव्हीएम मतांच्या मोजणीनंतर 1 मताने विजयी झाल्याचे जाहीर केले होते. असे असताना नंतर 333 टेंडर मतांच्या घोळ घालण्यात आला. ’फॉर्म -17 सी’नुसार 333 टेंडर मतांची नोंद झाली होती. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी फॉर्म-20 च्या माध्यमातून जाहीर केलेल्या निकालपत्रानुसार 213 टेंडर मतांची नोंद केली. या मतांच्या घोळाचा निवडणूक प्रक्रियेवर परिणाम झाला. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीवेळी नियमावलीचे सरळसरळ उल्लंघन केले. त्याचा निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या तत्वाला धक्का बसला आहे, असाही दावा याचिकेत केला आहे. अॅड. अमित कारंडे यांच्यामार्फत ही निवडणूक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच एकलपीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिंधे गटाचे रवींद्र वायकर यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
याचिकेत निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अमोल कीर्तीकर यांच्यामार्फत नेमलेल्या पोलिंग एजंट्सना एआरओ व आरओ टेबलच्या ठिकाणी बसू दिले नाही. जोगेश्वरी व वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या 563 तर गोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या 276 पोलिंग बूथचे फॉर्म-17 सी दिले नाहीत. मतांच्या फेरमोजणीसाठी सुरुवातीला तोंडी व नंतर लेखी स्वरूपात केलेली विनंतीही फेटाळली, असे याचिकेमध्ये म्हटले आहे.
मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर; अचानक स्क्रीनिंग बंद
मतमोजणी केंद्रामध्ये बेकायदेशीरपणे केलेल्या मोबाईल वापराचा मुद्दाही मांडण्यात आला आहे. 19 व्या राऊंडनंतर मतमोजणीचे स्क्रीनिंग बंद केले गेले. विशेष म्हणजे, 19 ते 26 व्या राउंडदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी सातत्याने स्वतःच्या जागेवरून उठून मोबाईलवर बोलत बाहेर जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले आहे. तसेच रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यानेही मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरला. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया पूर्णपणे संशयास्पद असल्याचा दावा याचिकेत केला आहे.
फेरमतमोजणीची विनंती नियम डावलून फेटाळली
मतमोजणीचे सर्व 26 राऊंडस पूर्ण झाल्यानंतर अमोल कीर्तीकर यांना 650 अधिक मते मिळाली होती. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी अमोल कीर्तिकर यांना 1 मत अधिक मिळाल्याचे जाहीर केले.
यावर कीर्तीकर यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी तातडीने आक्षेप घेतला होता. तसेच फेरमतमोजणीची विनंती केली होती. मात्र यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक नियमावली डावलून अमोल कीर्तीकर यांची विनंती लगेच फेटाळली.
लेखी विनंती फेटाळताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपला आक्षेप निकाल जाहीर केल्यानंतर विचारात घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र निकाल जाहीर केल्यानंतर विनंती अर्ज फेटाळला, त्यावेळी कीर्तीकर यांनी निकालानंतर आक्षेप घेतल्याचे कारण दिले आहे.
फेरमतमोजणीची मागणी धुडकावून लावत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेशी संबंधित नियमावलीची थट्टा केली आहे.
मतमोजणीच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगची विनंती देखील बेकायदेशीरपणे धुडकावली. न्यायालयाने याचिकेच्या सुनावणीवेळी ते व्हिडिओ रेकॉर्डिंग सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेतून केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List