‘कॅम्लिन’चे आधारस्तंभ सुभाष दांडेकर यांचे निधन
कॅम्लिन उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा, मराठमोळे उद्योजक सुभाष दांडेकर यांचे सकाळी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल उद्योग, सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे.
सुभाष दांडेकर हे चित्रकला आणि शैक्षणिक साहित्य निर्मितीतील अग्रेसर अशा कॅम्लिन उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा आणि आधारस्तंभ होते. शालेय विद्यार्थ्यांना लागणारी गणितीय उपकरणे, पेन्सिल, मार्कर, शाई यांसह चित्रकार व अन्य कलाकारांना लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, कार्यालयीन उत्पादने आणि व्यावसायिक उत्पादनांची निर्मिती कॅम्लिन या कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. सुभाष दांडेकर यांनी अनेक वर्षे या कंपनीची धुरा वाहिली.
कॅम्लिन हा एक आंतरराष्ट्रीय ब्रँड म्हणून पुढे आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी काळानुसार बदलत गेलेल्या तंत्रज्ञानाचा पूरेपूर वापर करून सतत नवे प्रयोग करण्यावर भर दिला. सुभाष दांडेकर यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्षपदही भूषवले होते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने राज्यातील व्यापार व उद्योगाच्या वाढीसाठी अनेक नवे उपक्रम सुरू केले.
मूल्यांबरोबरच नाविन्याचाही ध्यास
कॅम्लिन हा ब्रँड तयार करताना त्यांनी मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. कर्मचाऱ्यांच्या हिताला आणि श्रमाला त्यांनी नेहमीच महत्त्व दिले. नवनवीन तंत्रज्ञान, कौशल्ये आत्मसात करण्यासाठी जी साधने उपलब्ध आहेत, त्यांचा पुरेपूर वापर करून सतत शिकण्यावर त्यांचा भर होता. जे मिळवले आहे त्यावर समाधान न मानता आयुष्यात नवी उंची गाठण्यासाठी ते प्रयत्नशील होते. प्रत्येक काम अधिकाधिक चांगले करण्यावर त्यांचा कटाक्ष होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List