सातारा जिल्ह्यातील 100हून अधिक युवकांची फसवणूक; सैन्य दल, रेल्वे, डीआरडीओ, बीएमसीमध्ये नोकरी लावण्याचे दाखविले आमिष
सैन्यदल, भारतीय रेल्वे, डीआरडीओ, बीएमसी आदी ठिकाणी कामाला लावतो, असे सांगून सातारा जिल्ह्यातील शंभराहून अधिक युवकांची फसवणूक झाली आहे. काही युवकांची तब्बल 34 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती जावली तालुक्यातील कुडाळ येथील राजेंद्र दिलीप भिलारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भिलारे म्हणाले, हृषिकेश शंकर फाळके, राजेंद्र कालीदास देवकर, तानाजी शंकर देवकर, महेंद्र गजानन शेवते, रविंद्र बाळकृष्ण चव्हाण व चैतन्य तात्यासा तुपे या तरुणांची झालेली फसवणूक प्राथमिक स्करूपाची आहे. सातारा जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर व पुणे येथीलही शेकडो तरुणांना नोकरीच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. वरील सहा तरुणांची 34 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
राजेंद्र दिनकर सपकाळ (रा. नांदगिरी, ता. कोरेगाव) याने ही फसवणूक केली आहे. डीआरडीओ, बीएमसी, लष्कर, रेल्वे येथे कामाला लावतो, असे सांगून त्याने मुलांचा विश्वास संपादन केला. काही मुलांची कामे केल्याचे भासवून त्यांना मोबाईलमध्ये कॉल लेटर दाखवले. काही मुलांनी त्याला पन्नास हजार रुपये अनामत रक्कम देऊन उरलेली रक्कम वाराणसी येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर देण्याचे कबूल करण्यात आले. राजेंद्र सपकाळ यांची पत्नी संध्याराणी सपकाळ यांच्या अकाउंटला काही मुलांनी रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर केली आहे. हे तरुण या सर्व गोष्टींना साक्षीदार आहेत. गेली पाच वर्षे सपकाळ या माणसाला वारंवार फोन करून पैसे मागत असताना तो टाळाटाळ करत आहे तसेच जीवे मारण्याची धमकी देत आहे. पोलीस व प्रशासन कोणी माझे काही करू शकत नाही, अशी धमकी राजेंद्र सपकाळ देत असल्याचा आरोप तरुणांनी केला आहे.
युवकांचा बेमुदत उपोषणाचा इशारा
पोलिसांकडे या प्रकरणाची कारंकार तक्रार करूनही त्यांची दखल घेतली जात नाही. आम्ही पैसे घेण्यासाठी घरी गेलो असता, सध्या संध्याराणी सपकाळ शिविगाळ व वाईट कर्तन करत असून, पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देत आहेत. या संदर्भात आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही सर्व पीडित तरुण जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List