आता राहुल गांधी वारीत सहभागी होणार; 14 जुलैला मराठमोळा सोहळा अनुभवणार
महाराष्ट्रातील संस्कृती आणि भक्तीचा सोहळा म्हणजे वारी. आषाढी आणि कार्तिकी एकादशीसाठी वारकरी अनेक ठिकाणाहून दिंडीने निघून पंढरपूरात येतात. हा सोहळा अनुभवण्यासाठी राज्यासह देश-परदेशातून अनेक भाविक येतात. यंदाच्या आषाढी वारी सोहळ्यात काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी एक दिवस वारीत सहभागी होणार आहेत. ते रविवारी 14 जुलै रोजी वारीचा मराठमोळा सोहळा अनुभवणार आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पायी वारीत राहुल गांधी 14 जुलै रोजी सहभागी होणार आहेत. यंदा राहुल गांधी हा सवारीचा सोहळा एक दिवस अनुभवणार आहेत. पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम राबविला जातो. या वारीत साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा सहभाग असतो. यंदा या वारीत राहुल गांधी सहभागी होत भक्तीचा सोहळा अनुभवणार आहेत.
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी देशभरात दौरा केला होता. त्याला जनतेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता वारीत सहभागी होत राहुल गांधी वारकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने राहुल गांधी या सोहळ्यात सहभागी होत असल्याने त्याला महत्त्व आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List